शेलारांनी घेतला शिवसेनेचा समाचार

फडणवीस कोणतीही वाक्यं वापरतात त्यामागे त्यांचा गंभीर आणि गर्भित इशारा असतो. त्यामुळे पंढरपूरात केलेले विधान हा गर्भित इशाराच आहे.

जे स्वतः कुबड्यांवर आहेत, ज्यांचं पहिलं पाऊल कुबड्यांशिवाय पडत नाही, त्यांची बेळगाव आणि पश्चिम बंगालवर बोलण्याची औकातच नाही, असा सनसनाटी टोला लगावत भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

काँग्रेसने काळजी करावी

पश्चिम बंगालच्या निकालावरुन कालपासून भाजपला लक्ष्य करणाऱ्या सर्व पक्ष आणि नेत्यांना चोख प्रत्युत्तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिले. भाजपला पश्चिम बंगालमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. आम्ही त्यांना पराभूत करू शकलो नाही हे खरं आहे. आम्हाला पूर्ण विजय मिळाला नाही, पण यशाचे मोजमाप फक्त भाजपकडेच आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड जर अदृश्य शक्ती बद्दल बोलले असतील, तर त्यांची काळजी काँग्रेसने करावी. या अदृश्य हातांनी काँग्रेस भूईसपाट केली. पंढरपूरात काय झाले? स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याकडे बघायचे वाकून असा हा प्रकार आहे, असा टोला आमदार आशिष शेलार यांनी लगावला.

मलिक, पटोलेंवर बरसले

अर्धवट माहितीच्या आधारावर पत्रकार परिषद घेणारे म्हणजे नवाब मलिक. मोफत लस प्रकरणात ते तोंडावर आपटले आहेत. खोटी माहिती त्यांनी देऊ नये. नवाब मलिक गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, असे बोलत आहेत. मग पंढरपूरमध्ये त्यांच्या पक्षाला अपयश मिळाले म्हणून नवाब मलिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. नाना पटोलेंचं आयुष्य काळाकांडीच्या कामात गेलं. नाना पटोले व्यवहाराच्या सत्यतेवर माहिती ठेवत नाहीत. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही. माहितीविना बोलणं म्हणजे काळाकांडी, नाना पटोलेंची पत्रकार परीषद अशी टीका शेलार यांनी केली.

(हेही वाचाः पंढरपूर पोटनिवडणुकीमुळे भाजपला ‘संजीवनी’, फडणवीस ‘ते’ वाक्य खरे करणार का?)

पुनावालांना धमकी देणा-यांची माहिती आमच्याकडे

अदर पुनावाला प्रकरण गाजत आहे. वेगवेगळ्या पक्षांची नावं पुढे येत आहेत. पुनावाला यांना आताच सुरक्षा का मागाविशी वाटली? हा प्रश्न गंभीर आहे. त्यांचे संकेत स्थानिक पक्षाकडे जात असतील तर हा गंभीर मुद्दा आहे. केंद्राने आपलं कामं चोख केलं आहे. सद्यपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीच्या सुरक्षेची गरज वाटली असेल, तर केंद्राने त्यांना सुरक्षा पुरवली आहे. त्यात गैर काय? आज यावर राजकारण करायची गरज नाही. कोरोना काळात राजकारण न करता जनसेवेला प्राधान्य देण्याची भाजपची भूमिका आहे, असे शेलार म्हणाले. या प्रकरणात ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील, त्यांना उघडं करण्याचं काम भाजप करेल. आमच्याकडे त्याची माहिती सुद्धा आहे. ज्यांचे हात यामध्ये गुंतले आहेत, त्यांनी खबरदार रहावं असा गंभीर इशारा शेलार यांनी दिला. तसेच फडणवीस कोणतीही वाक्यं वापरतात त्यामागे त्यांचा गंभीर आणि गर्भित इशारा असतो. त्यामुळे पंढरपूरात केलेले विधान हा गर्भित इशाराच आहे, असेही पत्रकारांच्या प्रश्नावरील उत्तरात ते म्हणाले.

धोबीपछाड केल्याशिवाय राहणार नाही

लस मिळत नाही म्हणून बोंबलायचं आणि दुसरीकडे आम्ही लसीकरणामध्ये नंबर एक आहोत हेही ओरडायचं. ही आरडाओरड आपले अपयश झाकण्यासाठी सुरू आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ वाचाळवीरांचे आहे. ज्यावेळी आम्ही बोलत असलेल्या भाषेचा प्रश्न उपस्थितीत केला जातो, तेव्हा पाचही बोटे राष्ट्रवादीकडे जातात. भाजपाच्या नेत्यांविषयी, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांच्याविषयी, राज्याचे विरोधी पक्षनेते यांच्याविषयी राष्ट्रवादी पक्षाचे नेते सभेमध्ये, सोशल मीडियावर काय बोलत आहेत? हे एकदा पहा. त्यामुळे अजूनही आम्ही संयमाने वागत आहोत, हे लक्षात ठेवा. आमची भूमिका स्पष्ट आहे जनतेला मदत करणे. सर्व नेते राज्यातील जनतेला आधार वाटावा यासाठी फिरत आहेत. पण कुणी पक्षाने एकटं यावं, दुकटं यावं धोबीपछाड आम्ही योग्य वेळी केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी तिघाडीतील पक्षांचा समाचार घेतला.

(हेही वाचाः प्रमोद महाजनः युतीचा ‘हा’ आधारस्तंभ आज असता तर…)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here