‘इतिहासातील खानांची उचकी लागणारे आता कुठल्या बिळात बसले आहेत?’, भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) या संघटनेशी संबंधित विविध ठिकाणी एनआयएकडून छापेमारी करण्यात आली. याचा निषेध म्हणून शनिवारी पुण्यात काही समाजकंटकांकडून पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आले. या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत असतानाच यावरुन आता भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भाजपवर टीका करणारे उरल्या सुरल्या सेनेचे प्रमुख आता कुठल्या बिळात बसला आहात?,असा खोचक सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

आशिष शेलार यांचे ट्वीट

पीएफआयचा देशविरोधी कट उघड झाला आहे. पुण्यात तर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. मर्द असल्याचे वारंवार जाहीर करणाऱ्या,हिंदुत्ववादी असल्याचा कांगावा करणाऱ्या,सतत संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणारे, उरल्यासुरल्या पक्षाचे प्रमुख कुठे आहेत?

इतिहासातील खानांची सदैव “उचकी” लागणारे,भाजपाचा राजकीय कोथळा काढायला निघालेले,संकटे टळून गेल्यावर करुन दाखवलेचे “होर्डिंग” लावणारे, आता पीएफआयवरील कारवाईचे समर्थनही करायला तयार नाहीत आणि पाकिस्तान झिंदाबादचा निषेधही करत नाहीत! आता कुठल्या बिळात बसला आहात?, असे ट्वीट करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी नेस्को मैदानात झालेल्या गट प्रमुखांच्या मेळाव्यात भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपला मुंबई महापालिका निवडणुका महिन्याभरात घेण्याचे आव्हान त्यांनी दिले होते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पीएफआयविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्यामुळे तसेच पुण्यात देण्यात आलेल्या देशविघातक घोषणांचा निषेध न केल्यामुळे आता आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here