महापालिकेची ‘ती’ घोषणा म्हणजे ‘भुलभुलैया – भाग दोन’

172

मुंबईतील इमारतींच्या भांडवली मूल्यात सुधारणा न करण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळात झाला, त्यामुळे मालमत्ता करातील वाढ वर्षभर टळली, असे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र ५०० चौरस फुटाच्या घरांना करमाफ करणार होते, त्याचे पुढे काय झाले? त्यामुळे ही नवी घोषणा म्हणजे ‘भुलभुलैया भाग दोन’ असल्याची टीका भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईतील ५०० चौरस फुट पर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात येईल, अशी घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली. पण प्रत्यक्षात संपूर्ण कर माफ करण्यात आला नाही. मालमत्ता करातील सर्वसाधारण कर माफ केला, पण यासोबत घेतले जाणारे इतर कर माफ झाले नाहीत.

काय म्हणाले आशिष शेलार ?

मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंत एकूण १५ लाख ३६ हजार ३८० सदनिका असून या सदनिकांमधून वर्षाला सरासरी ६०० कोटीचा कर जमा होतो. हा संपूर्ण माफ केला तर फक्त पहिल्या वर्षी महापालिकेच्या उत्पन्नात घट होईल. कोरोना काळात तिजोरीत खडखडाट असताना बांधकाम व्यावसायिकांना प्रिमियम मध्ये ५०% सुट देऊन कोट्यवधीची खैरात वाटणाऱ्यांनी मुंबईकरांचे ६०० कोटी माफ केलेले नाहीत. त्यामुळे आता नव्याने करण्यात आलेली घोषणा पण फसवी आणि हा भुलभुलैयाचा पार्ट दोन आहे, असे आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

‘महाफसव्या’ घोषणांचे कंदील

महापालिकेला १०४२ कोटींचा तोटा सहन करुन, मुंबईकरांच्या मालमत्ता करात वर्षभर वाढ होणार नाही, अशी नवी घोषणा केली आहे. दिवाळी आहे म्हणून ‘महा फसव्या’ घोषणांचे कंदील लावणे सुरु आहे, बहुतेक यांच्या सगळ्या घोषणा म्हणजे फसवणुकीचा धूर सोडणारे फुसके फटाकेच आहेत, अशा खोचक शब्दांत आशिष शेलार यांनी सरकारवर टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.