कोकणातील फळझाडे पुन्हा जगवण्यासाठी शेलारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

तज्ज्ञ समितीची स्थापना करुन, या कार्यास तीन दिवसांच्या आत मार्गी लावावे अशी विनंती, आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

कोकण किनारपट्टीवर व सह्याद्री नजीकच्या पट्ट्यामध्ये फळ बागांचे विशेषतः आंबा, नारळ, केळी आदी वृक्षांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे शेकडो बागायतदारांचे आतोनात नुकसान झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत करुन, उन्मळून पडलेली झाडे त्याच ठिकाणी शास्त्रोक्त प्रयत्नाने उभी करण्याबाबत शासनाने विशेष प्रयत्न करावेत, याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे भाजपा नेते, आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधले आहे.

काय म्हणाले शेलार

गेली दोन दशके मुंबईतच नव्हे, तर जगभरच्या वृक्ष लागवडीच्या व त्यानंतर घडणाऱ्या वादळाच्या नुकसान दुरुस्तीची एक पद्धत उपलब्ध आहे. त्या तंत्रज्ञानाद्वारे उन्मळून पडलेल्या झाडांची मुळे स्वच्छ करुन व झाडांच्या तुटलेल्या फांद्या आणि पाने यांची योग्य ती छाटणी करुन, ती झाडे पुन्हा उभी करता येतात.

अशी आहे पद्धत

त्यासाठी दाभोळकर तंत्रज्ञानच्या मदतीने ४ x ४ फूट अथवा जेवढी झाडांच्या मुळांची खोली उपलब्ध असेल, त्या खोलीचा खड्डा खोदून त्यातील पाणी काढून, त्यात डी ऑईल्ड निमकेक चांगली लाल माती आणि त्या भागात असलेल्या वनराईची वाळलेली पाने आणि काटक्या त्याचे स्तर रचून एका सपोर्टच्या मदतीने झाड उभे करण्यात येते. त्यानंतर त्याला दर आठवड्याला तीन ते पाच लिटर अथवा झाडाच्या बुंध्याचा अंदाज घेऊन, आवश्यक तेवढे पाणी देण्यात येते. हे दिल्यानंतर झाडाची मुळे विशेषतः आंब्याची मुळे आपोआप जमिनीत रुजतात व पहिल्या वर्षीच पाने यायला सुरुवात होते. दोन ते तीन वर्षांत उत्पादन सुरू होते. म्हणजे पाच वर्षांच्या आत त्याच्या पूर्व क्षमतेच्या ५०% अंदाजे उत्पादन होऊ शकते आणि दरवर्षी उत्पादन वाढत जाते. हे तंत्रज्ञान वापरताना कृषी विद्यापिठातील व मुंबई महापालिकेतील उद्यान विभागाच्या तज्ज्ञांना प्रथमदर्शनी प्रात्यक्षिक दाखवावे लागेल आणि त्यानंतर त्याला आवश्यक असलेले फोर्स लिफ्टस् आणि क्रेन या तातडीने तिथे हलवून ते काम तीन ते सात दिवसांत वादळ थांबल्यानंतर सुरू करणे आवश्यक आहे. याद्वारे आंबा, नारळ, काजू व इत्यादी अनेक फळझाडांना आपण पुनर्जिवीत करू शकतो.

(हेही वाचाः रत्नागिरी जिल्ह्याचे प्रचंड नुकसान! साडेतीन लाख वीज कनेक्शन बंद!)

तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी

आज या प्रत्येक झाडाला उभे करण्याचा खर्चाचा अंदाज देणं कठीण आहे. पण अवघ्या तीन ते पाच हजार रुपयांत जे झाड शेतकऱ्यांना पुन्हा फळ देणारे ठरेल, तसेच हे काम शेतकऱ्यांना मानसिकदृष्टया शक्ती देणारे ठरेल. म्हणून यासाठी तात्काळ टास्क फोर्स निर्माण करण्यात यावी. ज्यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ, मुंबईतील खाजगी संस्था आणि मुंबई महानगरपालिका या संस्थांचा गट तयार झाला आणि जागोजागी जर त्यांनी प्रात्यक्षिके केली तर १५ दिवसांमध्ये नवीन उत्साहामध्ये शेतकरी कामाला लागेल. त्यामुळे तज्ज्ञ समितीची स्थापना करुन, या कार्यास तीन दिवसांच्या आत मार्गी लावावे अशी विनंती, आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here