खड्ड्यांवरुन शेलारांची शिवसेना आणि सुप्रियाताईंवर जोरदार टीका

खड्ड्यांचे खोटे आकडे दाखवण्यासाठी, आकडे मोठे दाखवून कंत्राटदाराला मदत करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांनी खड्ड्यांबाबतीत घेतलेली बैठक म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे, तर मुंबईच्या महापौर आता धावाधाव करत आहेत कारण त्यांना पळता भुई थोडी झालेली आहे, अशा शब्दांत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी रस्त्यावरील खड्ड्यांच्या विषयावरुन शिवसेनेवर जोरदार टीका केली. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचा “सेल्फी विथ् खड्डे”कार्यक्रम आता कुठे गेला? असा खोचक सवालही त्यांनी केला.

(हेही वाचाः ‘शिवसेना’ लय भारी, ‘खड्ड्यात’ गेली जबाबदारी! मुंबईकरांचे रोजचे हाल दाखवणारा व्हिडिओ)

सुप्रियाताई कुठे गेल्या?

मुख्यमंत्र्यांनी बुधवारी केलेले विधान हे भाषणातील वाक्याप्रमाणे आहे. जर मुख्यमंत्री महोदयांनी राज्यभरातले रस्ते ज्या विविध एजन्सीच्या अंतर्गत येतात त्या सगळ्या एजन्सीची बैठक घेतली असती, तर आम्हाला पटलं असतं. त्याच्याही पुढे जाऊन एखाद्या तरी कंत्राटदारावर कारवाई केली असती, तर आमचा विश्वास बसला असता. खड्डे बुजवण्यासाठी वापरात येणाऱ्या मालाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली असती, तर खरे वाटले असते. त्यामुळे खड्ड्यांबाबत जी बैठक झाली तो सेल्फी विथ् खड्डे सारखा दिखाऊपणा होता. केवळ दिखाऊपणा केल्याने जनतेचे प्रश्न सोडवले जाऊ शकत नाहीत. आता खासदार सुप्रियाताई सुळे कुठे गेल्या? सेल्फी विथ खड्डे हा त्यांचा कार्यक्रम कुठे गेला? त्यांनीही भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती करतो, असेही शेलार म्हणाले.

(हेही वाचाः मुंबईतील ९२७ खड्डे बुजवायला ४८ कोटींची तरतूद का केली? ॲड. आशिष शेलारांचा सवाल)

महापौरांना पळता भुई थोडी

आता महापौरांना पळता भुई थोडी झाली आहे. गणपतीपूर्वी पावसाळ्याच्या काळात महापौर महोदयांनी ही पाहणी केली असती तर जनतेला खरे वाटले असते. आता त्यांचा प्रवास आणि धावपळ ही पळता भुई थोडी आहे. मुंबईकर नागरिकांची त्रस्त भावना त्यांना आता दिसते आहे. निवडणुका समोर आहेत, म्हणून धावाधाव सुरू आहे. कंत्राटदारांची बिलं काढण्यासाठी, एवढे खड्डे बुजवले, खड्ड्यांचे खोटे आकडे दाखवण्यासाठी, आकडे मोठे दाखवून कंत्राटदाराला मदत करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे.

(हेही वाचाः महामार्गांच्या दुरुस्तीला ‘वाट’ सापडली! ‘या’ तारखेपर्यंत खड्डे बुजवण्याचे निर्देश)

कारवाई केली का?

मुंबईत गेल्या पंचवीस वर्षांमध्ये खड्ड्यांवर 21 हजार कोटी रुपये खर्च झाले. कंत्राटदाराला महामार्ग मिळाला मुंबईकरांच्या रस्त्यांची मात्र वाट लागली. केवळ या वर्षी प्रत्येक वॉर्डात दोन कोटी असे 48 कोटी रुपये खड्डे भरण्यासाठी खर्च होणार आहेत. महापालिकेचे पोर्टल सांगते 927 खड्डे, महापौर म्हणतात आम्ही 42 हजार खड्डे बुजवले. कंत्राटदाराला जास्त पैसे मिळाले पाहिजेत, म्हणून बनवाबनवी सुरू आहे. कंत्राटदाराच्या समर्थनाचे आकडे किंवा त्याच्या समर्थनाच्या भूमिका शिवसेना का घेत आहे? मुख्यमंत्री महोदय म्हणतात कंत्राटदारांवर कारवाई करा, गेल्या वर्षभरात महापालिकेने अशी एकदा तरी कारवाई केली का?, असा थेट सवालही आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

(हेही वाचाः अभियंत्यांना खड्डे पावले : इतर कामांमधून करणार कार्यमुक्त)

…तर खबरदार

एका तरुणाने खड्ड्यात रांगोळी काढली, त्याच्यावर शिवसेनेकडून हल्ला तर होणार नाही ना? अशी भिती आहे. कारण मागे एका रेडिओ जॉकीने एक गाणे तयार केले तेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले होते. जर असे पुन्हा या रांगोळी काढणाऱ्या तरुणाच्या बाबतीत कराल तर खबरदार, असा इशारा ही आमदार आशिष शेलार यांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here