मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना दोन, मग आम्हाला एक का? शेलारांचा भर सभागृहात सवाल

144

महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी होत असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच अनेकदा सभागृहात हास्यविनोद करत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न होत असतो.

पण शुक्रवारी भाजप आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात बोलताना माईकच्या संख्येवरुन आवाज उठवत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबतची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन आशिष शेलार यांना दिले आहे.

आशिष शेलारांचा हरकतीचा मुद्दा

या सभागृहातील सर्व सदस्य हे समान पद्धतीवर काम करणारे आहेत, सगळ्यांचे अधिकार आणि विशेषाधिकार समाना आहेत. पण विधानसभा सभागृहात मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या तिघांनाच दोन माईक देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर विधानसभा अध्यक्षांना देखील एकच माईक देण्यात आला आहे.

सभागृहातील प्रत्येक सदस्याचा आवाज हा एका माईकवरुन महाराष्ट्राभर पोहोचतो. बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ,आदित्य ठाकरे आणि आमच्यासारखे सगळेच सदस्य हे एका माईकवरुन काम करू शकतात. त्यामुळे केवळ या तिघांनाच दोन माईक देण्याचं कारण काय, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. या तीन सदस्यांचा आवाज कुठे बाहेर जातोय का, त्यांच्यावर कोणी पाळत ठेवलीय का, यांच्याबाबत कोणाला विशेष माहिती हवी आहे का, असे सवाल उपस्थित करत शेलार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

अध्यक्षांनी दिले आश्वासन

दरम्यान, याबाबत विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी देखील शेलारांना आश्वासन दिले आहे. तुम्हाला एका माईकची सुद्धा गरज नाही माईकशिवाय तुमचा आवाज महाराष्ट्रात पोहोचू शकतो. पण तरीही तुमच्या हरकतीची सखोल चौकशी करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांचा आवाज कुठे बाहेर तर जात नाही ना याची माहिती घेऊ, असे सांगत या मुद्द्यावर अध्यक्षांनी पडदा टाकला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.