‘सुनील पाटील गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलंय?’

या केसचा तपास सीबीआयकडे देण्यास शेलार आग्रही

69

धुळ्यातील सुनील पाटील याचा राष्ट्रवादीशी संबध काय? तो गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलंय? तो परराज्यातून “गेम” वाजवतो म्हणतोय त्यामुळे त्याच्यावर राज्य शासनाने तातडीने गुन्हा दाखल करुन या केसचा संबंध आंतरराज्य असल्याने तपास सीबीआयकडे द्यावा, अन्यथा यामध्ये राज्य सरकारचे हात गुंतलेले आहेत हे स्पष्ट होईल. अशी आग्रही मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे. गेले काही दिवस राष्ट्रवादीच्या सुरु असलेल्या पत्रकार परिषदा म्हणजे, ड्रग्ज आणि पोलीस बदल्यांमधील दलालांना वाचवण्यासाठी सुरु असलेला एकपात्री प्रयोग असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

सह्याद्रीचा आता वसुली अड्डा झालाय का?

दरम्यान, भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात बेदिली माजली आहे. दाऊदचा हस्तक आणि ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत, असा रिंकू पठाण याला लॉकडाऊन काळात सोडण्यात आले. तसेच जेव्हा राज्यात कडकडीत लॉकडाऊन सुरु होते तेव्हा हा रिंकू पठाण सह्याद्री अतिथी गृहावर जाऊन तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रोटेक्शन मनी ठरवण्यासाठी भेटला. राज्यात फेसबुक आणि सोशल मिडियावर कोणी लिहीले तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात आणि दाऊदचा हस्तक गृहमंत्र्यांना सह्याद्रीवर भेटतो? सह्याद्रीचा आता वसुली अड्डा झालाय का? असा सवाल भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला.

हा एकपात्री प्रयोग राज्याला बदनाम करणारा

रिंकू पठाण भेटल्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी हळूहळू धागेदोरे जमा करून ड्रग्ज माफियांना अटक करायला सुरुवात केली. सुमारे २० ड्रग्ज वितरकांना अटक करण्यात आली. ही माहिती एनसीबीने एनआयए आणि ईडीला दिली. आरोपी रिंकू पठाण आणि करिम लाला यांच्या माणसांना अटक का करता म्हणून एनसीबीला विचारणा करण्यात येत आहे. एनसीबीच्या विरोधात कटकारस्थान रचले जात आहे. राज्यात अशा प्रकारे बेदीली माजली आहे. आर्यन खानच्या प्रकरणात एकपात्री प्रयोग गेले महिनाभर सुरु आहे, तो घातक आहे हे आज स्पष्ट झाले. हा एकपात्री प्रयोग राज्याला बदनाम करणारा आणि तरुणांना ड्रग्जच्या खाईत ढकलणारा आहे.

…तर शौचालयात तोंड लपवायला जागा उरणार नाही

आज जे नाव समोर आले तो सुनील पाटील कोण आहे? सुनील पाटील एनसीपीचा सदस्य आहे की नाही? त्याचा राष्ट्रवादीशी संबंध काय? अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना आणि नेत्यांना आम्ही संधी देतो. खरे सांगा नाही तर आता आमच्या हाताला बरेच काही लागले आहे. जर सत्य समोर आले तर तुम्हाला बाथरूमच्या आतमध्ये शौचालयात सुध्दा तोंड लपवायला जागा उरणार नाही, असा इशाराही आमदार अँड आशिष शेलार यांनी दिला.

(हेही वाचा – रुग्णालयातील आगी म्हणजे सरकारचा ढिसाळ कारभार!)

कोण हा माणूस? त्याचा धंदा काय?

हा सुनील पाटील माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील आबा यांची बदनामी करतो आणि राष्ट्रवादीला त्यांचे काही वाटत नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तळपायाची आग मस्तकाला का जात नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच धक्कादायक म्हणजे हा सुनील पाटील आपल्या संभाषणात आत्ताचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची बदनामी करतोय. ज्या गृहमंत्री वळसे-पाटील यांचा महाराष्ट्र आदर करतो त्यांच्या विषयी हा सुनील पाटील बोलतो? मद्यपींच्या बैठका? काय चाललंय हे? कसल्या बैठका? कोण हा माणूस? या सुनील पाटलांचा धंदा काय? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला. या सुनील पाटीलचा धंदा हा मंत्रालयातील बदल्यांच्या दलालीचा आहे. त्यामुळे हा सुनील पाटील गायब आहे, परागंदा आहे की राष्ट्रवादीने त्याला लपवले आहे. आमचा राष्ट्रवादीवर आरोप आहे की, पोलीस बदलत्यांमधील मुख्य दलाल हा गयब, परागंदा नसुन त्याला राष्ट्रवादीने सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे का? संरक्षण दिले आहे का? इंडियन पोलीस सर्वीसचा खाक्या मोडकळीस आणण्याचा हा सुनील पाटील प्रयत्न करीत असल्याने त्यावर गुन्हा दाखल करुन तपास सीबीआयकडे तपास द्यावा.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.