शरद पवारांना बारमालकांचा कळवळा, शेतकऱ्यांचाही ठेवा! भाजपचा टोला 

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले असून त्याद्वारे बार आणि हॉटेल मालकांना सवलत देण्याची मागणी केली, त्याचा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी खरपूस समाचार घेतला.

110

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असतानाच लागलीच त्यांनी कोरोना संकटाच्या काळात हॉटेल आणि परमीट बार मालकांच्या अडचणीवरून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, ज्यामध्ये या व्यावसायिकांना वीज बिल आणि कर भरणामध्ये सवलत देण्याची मागणी केली. त्यावर भाजपने शरद पवारांना टोला हाणला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ‘साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल, अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो, असे म्हटले आहे.

…आता मराठा समाजाकडे लक्ष द्या! 

शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय, असेही ट्वीट भातखळकर यांनी केले.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात काय म्हटले? 

  • कोविड-१९ ह्या जागतिक महामारीच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
  • कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
  • या पार्श्‍वभूमीवर हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील काही प्रतिनिधींनी त्यांच्या समस्यांबाबत आपली भेट घेऊन अवगत केले.
  • त्यानुसार हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकांना वीज बिलामध्ये सवलत देण्यात यावी.
  • हॉटेलने-परमीट, बार मालकांना अबकारी कराचा भरणा किमान ४ हफ्त्यांमध्ये करण्यासाठी सवलत द्यावी.

(हेही वाचा : २१० एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर परिवहन मंत्री म्हणतात, आता लस द्या!  )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.