तुमच्या स्क्रिप्टनुसार आम्ही काम करायचं का? पाटलांचा सवाल

सरकारने त्यांचे काम करावे, आम्ही आमचं काम करत राहू.

शिवसेना सध्या कोणीतरी दिलेल्या स्क्रीप्टनुसार काम करते, त्यामुळे आम्ही देखील तुमच्या स्क्रिप्टनुसार काम करायचं का? असा थेट सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला विचारला आहे. तसेच सरकारने त्यांचे काम करावे, आम्ही आमचं काम करत राहू, असा सल्लाही त्यांनी दिला. कोथरुड मधील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दंडात शस्त्र उचलायची ताकद आहे का?

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कॅबिनेट मंत्री आहेत, पण त्यांच्या जर-तरच्या वाक्यावरुन त्यांना अटक होते. त्यापेक्षा संजय राऊत यांचे कोथळा काढू हे वाक्य भयंकर आहे. त्यावर मी फक्त एवढंच म्हटलं की, कोथळा काढाण्यासाठी हातात जे शस्त्र घ्यावं लागतं ते घेण्यासाठी तुमच्या दंडात तेवढी ताकद आहे का बघा? त्यामुळे त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम करत राहू, ते कुणीतरी दिलेल्या स्क्रिप्ट नुसार काम करतात. आम्ही देखील तसंच काम करायचं का? असा थेट सवाल त्यांनी यावेळी विचारला.

(हेही वाचाः राजकारण आपलं होतं, पण जीव जनतेचा जातो… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारले)

पूरग्रस्तांना मदत नाहीच

राजू शेट्टी यांच्या आंदोलनावर बोलताना ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पंचनामे पूर्ण झालेले नसतानाही तातडीने मदत देऊ केली. आता नुकत्याच सांगली-कोल्हापूरमध्ये येऊन गेलेल्या पूरानंतर पंचनामे होऊनही जर पूरग्रस्तांना मदत मिळत नसेल, तर का आक्रमक होऊ नये?, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच कोविडमध्ये नुकसान झालेल्यांना राज्य सरकारने जे पॅकेज जाहीर केले, त्याचा एक रुपयाही मदत मिळालेली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राऊतांचे कारस्थान

संजय राऊत २०१४ पासून सातत्याने भाजपासोबत सरकार होऊ नये यासाठी काम करत आहेत. २०१४ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांची एकूण संख्या १४४ पर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे संजय राऊत यांना त्यावेळी काही करता आले नाही. मात्र २०१९ मध्ये तिघांची एकूण संख्या १४४ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्रित घेऊन सरकार बनवण्यासाठी काम केलं. दुर्दैवाने उद्धव ठाकरेंना हे लक्षात येत नाही. संजय राऊत हे शिवसेनेसाठी नाही, तर शरद पवार यांच्यासाठी काम करत आहेत. यातून एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होत आहे, कॉंग्रेस लयास गेली आहे. तर शिवसेना दिवसेंदिवस कमकुवत बनत चालली आहे.

(हेही वाचाः पडळकर सहा वेळा का म्हणाले ‘किंबहुना’?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here