संजय राऊत यांनी खरंच राजकारण सोडावं, ‘या’ नेत्याचा सल्ला

गीतेंच्या या विधानानंतर संजय राऊत यांनी खरंच राजकारण सोडावं, असा टोला या नेत्याने लगावला आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या विधानाचे राजकीय पडसाद उमटले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये यामुळे शाब्दिक संघर्ष निर्माण झाला आहे. मात्र गीतेंच्या या विधानाचे विरोधी पक्ष भाजपाने चांगलेच भांडवल केले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. गीतेंच्या या विधानानंतर संजय राऊत यांनी खरंच राजकारण सोडावं, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

शरद पवार यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं उदाहरण मिळाल्यास मी राजकारण सोडेन, असं संजय राऊत सारखे सांगत होते. पण आता त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी हे उदाहरण दाखवून दिल्यामुळे संजय राऊत यांनी आता खरंच राजकारण सोडायला हवं, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर केली आहे.

(हेही वाचाः शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत!)

भाजपाचे शिवसेना-राष्ट्रवादीवर शरसंधान

शरद पवार देशाचे नेते आहेत, अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी गीतेंच्या विधानावर बोलणे टाळले. पण गीतेंच्या विधानाचा राजकीय फायदा घेत भाजपा नेत्यांनी मात्र महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर वाक्बाण सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर संजय राऊत भाजपा नेत्यांवर काय ताशेरे ओढतात, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले होते गीते?

राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. शिवसेनेचे कधीच काँग्रेसशी जुळणार नाही आणि दोन्ही काँग्रेस या कधीच एकत्र येणार नाही. कारण मुळामध्ये राष्ट्रवादीचा जन्म हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच, असे देखील गीते म्हणाले होते.

(हेही वाचाः गीतेंचे ‘ते’ विधान म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार! तटकरेंचा संताप)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here