विधानसभेच्या आवारात भाजपने स्थापन केली दुसरी विधानसभा! अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही राडा

149

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनानंतर राज्यातील भाजप आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या दुस-या आणि शेवटच्या दिवशी सरकारचा निषेध करण्यासाठी भाजप आमदारांनी विधान भवनाच्या पाय-यांवर दुसरी विधानसभा स्थापन केली आहे. या प्रती विधानसभेत विरोधकांनी सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव सादर केला. या प्रती विधानसभेवर कारवाई करण्यात आली आहे.

काय झाले नेमके?

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आल्यानंतर भाजप आमदारांचा संताप उफाळून आला आहे. खोट्या आरोपांखाली आमदारांचे निलंबन करण्यात आले असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रती विधानसभेत सांगितले. राज्यातील शेतकरी, ओबीसी, मराठा, एमपीएससी या सगळ्या प्रश्नांवर सभागृहात आपण आवाज उठवत आहोत. त्यामुळे खोट्या आरोपांखाली आमदारांना निलंबित केलं जात आहे. म्हणून आज या प्रती विधानसभेत मी या सरकारचा धिक्कार आणि निषेधाचा प्रस्ताव ठेवत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. भाजपने कालिदास कोळंबकर यांना भाजपच्या प्रती विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान केले आहे. त्याठिकाणी भाजपने माईक आणि स्पीकर लाऊन या प्रती विधानसभेतील कारभाराचे थेट प्रक्षेपण केले जात आहे.

(हेही वाचाः भास्कर जाधव सोंगाड्या! नितेश राणेंचा घणाघात)

विधानसभेत सत्ताधा-यांचा हल्लाबोल

भाजपच्या या प्रती विधानसभेनंतर विधानसभेत सत्ताधा-यांनी भाजपवर जोरदार टीका केली. विधानसभेच्या आवारात परवानगीशिवाय काहीही करता येत नाही. विरोधक तिथे स्पीकर लावून भाषणं देत आहेत, भाजपकडून नियमांचं उल्लंघन झाल्याचे शिवसेना आमदार सुनिल प्रभू आणि मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे भाजपच्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली.

प्रती विधानसभेवर कारवाई

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या या प्रती विधानसभेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर भाजपच्या या प्रती विधानसभेवर कारवाई करण्यात आली असून, तेथून भाजप आमदारांना हटवण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.