राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना राज्यात कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असताना जळगावातील जामनेरमध्ये भाजपकडून गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. जळगावातील या मोर्च्यामुळे भाजपचे आमदार गिरीश महाजन अडचणीत सापडले आहे. या मोर्च्याच्या आयोजनामुळे गिरीश महाजन यांच्या सह इतर ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी नियमित वीज पुरवठ्यापासून वंचित राहत असल्यानं सरकारचा निषेध करण्यासाठी गिरीश महाजन आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वेगवेगळ्या भागात जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आधीच दिला होता. असे असताना देखील आमदार गिरीश महाजन यांनी हा मार्चा काढला. या प्रकरणी महाजन यांच्यासह ११ जणांविरोधात जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं. या मोर्च्यात सहभागी झालेल्या गिरीश महाजन यांच्यासह भाजपाचे नेते, तालुकाध्यक्ष आणि विधानसभा प्रमुख यांच्यासह एकूण ११ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा -सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री हा हिताचा निर्णय, संजय राऊतांनी सांगितलं कारण )
यापूर्वीही महाजनांसह १२५ जणांवर गुन्हा दाखल
गिरीश महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचं पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गुन्हादेखील दाखल झाला आहे. यापूर्वीही जळगावात मोर्चा काढल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी केवळ गिरीश महाजनच नाही तर त्यांच्यासह १२५ जणांविरोधात जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जमावबंदीचे पालन न केल्याचा आरोप ठेवत गुन्हा दाखल झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी आमदार गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आंदोलन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला गेला होता.
Join Our WhatsApp Community