राठोडांना मंत्री करण्याचा निर्णय कोणाचा?, भाजपच्या मंत्र्याने स्पष्टच सांगितले

145

गेल्या महिन्याभरापासून राज्यातील रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मंगळवारी मुहूर्त मिळाला. त्यानुसार शिंदे गटाच्या 9 आणि भाजपच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महाविकास आघाडीत मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांना पुन्हा एकदा नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

त्यामुळे विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या निर्णयावरुन सरकारला घरचा आहेर दिला आहे. याचबाबत आता भाजप आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोड यांना मंत्री बनवण्याचा निर्णय घेतल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले महाजन?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेल्या संजय राठोड यांच्यांवर भाजपने जोरदार टीका केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत असताना आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. पण आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पुन्हा एकदा राठोड यांना मंत्रीपद दिल्यामुळे विरोधकांसोबतच चित्रा वाघ यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याबाबत गिरीश महाजन यांनी आपले मंत मांडले आहे.

(हेही वाचाः …म्हणून संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले कारण)

चित्रा वाघ या खूप आधीपासून या प्रकरणाबाबत संघर्ष करत आहेत. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक मत त्यांनी मांडलं आहे. पण याबाबत सविस्तर चौकशी झाली असून त्याबाबतची स्पष्टता देखील समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोड यांना मंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला असावा, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

चित्रा वाघ यांची नाराजी

“पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणा-या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झाले असले तरीही त्यांच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे….जितेंगे” ,असे म्हणत चित्रा वाघ यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचाः Bihar Political Crisis: आता बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांनी घेतला भाजपशी काडीमोड)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.