पडळकरांचा आता ‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’ नारा

राज्याच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे आता पुढे सरसावले आहेत.

139

गोपिचंद पडळकर… भाजपाचे तडफदार आमदार. बैलगाडा शर्यतीचा विषय असो वा पवारांवर त्यांनी केलेली टीका असो. ते नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता गोपिचंद पडळकर एसटी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील एसटी कर्मचारी तुपाशी व्हायचा असेल तर “युनियन मुक्त कर्मचारी” गरजेचा असल्याचे सांगत यापुढच्या काळात ‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’ हा आपला नारा असल्याचे ते म्हणाले.

(हेही वाचाः आधी बैलगाडा शर्यत आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी पडळकर मैदानात)

युनीयनच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या

राज्याच्या अनेक एसटी कर्मचारी संघटना कोट्यवधी रुपये एसटी कर्मचाऱ्यांच्याकडून घेतात. ते स्वतः तुपाशी खातात, तर एसटी कर्मचारी आणि त्याचे कुटुंब मात्र उपाशी राहते. त्यामुळे आता सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी युनियनच्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन, एसटी कामगार युनियनचे फलक फेकून देण्याचे आवाहन पडळकर यांनी केले आहे. राज्याच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे आता पुढे सरसावले असून, आटपाडीच्या झरे येथे गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील एसटी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून सुरू असणारी लूट, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि विविध मागण्यांच्या बाबतीत चर्चा झाली.

आता आक्रमक व्हा

एसटी कर्मचाऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुढे येणे अपेक्षित होते. मात्र, या संघटना केवळ सभासदांकडून कोट्यवधी रुपये गोळा करत आहेत. त्यांची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतही नीट शिक्षण घेता येत नाही. एसटी कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही. जे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तेच एसटी कर्मचाऱ्यांना, ही आपली भूमिका आहे.

(हेही वाचाः रडगाणे सुरुच… एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी पुन्हा मिळणार ‘थांबा’?)

एसटी कर्मचा-यांनो रस्त्यावर उतरा

त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे, अशी मागणी पडळकर यांनी केली. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने हा निर्णय घ्यावा आणि सरकार हा निर्णय घेणार नसेल तर एसटी कर्मचाऱ्यांनीही आपल्या न्याय हक्कासाठी शेतकऱ्यांचा आसूड घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे, असे पडळकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.