लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराचा निषेध म्हणून महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील व्यापारी आणि सर्वसामांन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
विरोधी पक्ष भाजपाकडूनही याबाबत सरकारला जाब विचारण्यात येत आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील यावरुन सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार आगपखड केली आहे. तसेच संजय राऊत यांनाही राज्यातील शेतक-यांच्या परिस्थितीवरुन त्यांनी थेट सवाल केला आहे.
(हेही वाचाः महाराष्ट्र बंद : उत्स्फूर्त की जबरदस्ती?)
योगींकडे क्षमता आहे
लखीमपूर येथील घटनेबद्दल आम्हाला संपूर्ण सहानुभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे क्षमता आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आपल्या घरात आग असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा
जनाब संजय राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे. शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाहीत, अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे. त्यामुळे तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे, अशी जोरदार टीका पडळकर यांनी यावेळी केली.
(हेही वाचाः ‘महाराष्ट्र बंद’च्या दिवशी भाजपाने शिवसेनेला करून दिली ‘ही’ आठवण!)
महाराष्ट्र बंदचा देखावा
मुळात तुम्हाला काकांचं दु:ख सतावत आहे. कारण पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची कीड साफ करत आहेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे कारखाने कवडी मोल भावाने गिळणाऱ्यांवरती फास आवळत आहेत. त्याचंच पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा आहे, असा गंभीर आरोपही पडळकर यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community