मुलांना आमदार-खासदार करायला जागा आहेत, बहुजन समाजाने काय सतरंज्याच उचलायच्या का?

हे फक्त एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळत आहेत का?

149

बैलगाडा शर्यत असो, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असो किंवा एमपीएससी मधील पदभरतीचा प्रश्न असो. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बेधडकपणे ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आरोग्य विभागातील पदभरतीच्या परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच ठाकरे सरकार टीकेचे धनी होत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा पडळकर यांनी एमपीएससीतील पदभरतीवरुन ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे. यावेळी बहुजन समाजातील मुलांनी फक्त यांच्या सतरंज्याच उचलाव्यात, अशी या सरकारची मानसिकता असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पदभरतीचं राजकारण?

ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गमवावा लागला. त्यांनतरही या प्रस्थापितांच्या सरकारनं ना नियुक्त्या दिल्या ना पदभरत्या केल्या. आता तर वेगवेगळ्या वीस विभागांत जवळपास ११ हजार ३५१ पदे रिक्त असताना, फक्त ४ हजार २६४ रिक्त पदांवरच भरती करावी, अशी मागणी सरकारने लोकसेवा आयोगाकडे केली आहे.

(हेही वाचाः त्यांना जमलं नाही तर आम्ही ‘पुन्हा येणार’ आहोत… आता फडणवीसांची भविष्यवाणी)

यापेक्षा कहर म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात सर्वच श्रेणींतील २ हजार ५०० च्या आसपास पदं रिक्त असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कुठल्याही पदभरतीची सरकारकडे मागणी केली नाही. हीच परिस्थिती अनके खात्यांची आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

टक्केवारीच्या फुगड्या खेळत आहेत का?

प्रशासन व सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. हे फक्त एकमेकांसोबत टक्केवारीच्या फुगड्या खेळत आहेत का?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे. स्वतःची मुलांना आमदार-खासदार करण्यासाठी या प्रस्थापितांकडं रिक्त जागा आहेत. पण बहुजन समाजातील मुलांनी मात्र यांच्या सतरंज्याच उचल्याव्यात ही मानसिकता या सरकारची आहे, असा गंभीर आरोपही पडळकर यांनी केला आहे.

(हेही वाचाः पदांच्या भरतीसाठी सुरू आहे ‘दलाली’! फडणवीसांचा गंभीर आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.