गेल्या २ ते ३ महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. लालपरी पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांसोबत पवारांनी खुलेआम चर्चा केली आहे. मात्र यावरून आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना सल्ला देताना पडळकरांनी पवारांना पुन्हा डिवचलं असून दुसऱ्याकडे जाण्यापेक्षा स्वतः कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून विषय सोडवावा असा सल्ला पडळकरांनी अनिल परब यांना दिला आहे.
काय म्हणाले पडळकर बघा…
पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वतः पुढे जाऊन संप मिटवा, पडळकरांचा परबांवर निशाणा#msrtc #msrtcstrike #gopichandpadalkar pic.twitter.com/ot5ZvA1WnE
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 11, 2022
परबांनी एसटी कर्मचाऱ्यांना भेटावं
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन परिवहन मंत्री अनिल परब यांना पडळकर यांनी लक्ष्य केलं आहे. अनिल परब यांना विनंती करायची की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात. त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत?असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकर यांनी अनिल परब यांना स्वत: एसटी कर्मचाऱ्यांना भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल, याची आठवण देखील पडळकर यांनी करुन दिली आहे.
(हेही वाचा – ऐकावं ते नवलंच! माणसाच्या शरीरात आता डुकराचं ह्रदय धडधडणार!)
चर्चा करा आणि तोडगा काढा
पुढे पडळकर असेही म्हणाले की, माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा, चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं लढा दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत असल्याचं म्हटलंय. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवार साहेबांना तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
Join Our WhatsApp Community