मविआचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही कोलांट्या उड्या मारता! पडळकरांचे ‘रोखठोक’ उत्तर

याच ओवैसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला.

बैलगाडा शर्यत असो, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असो किंवा एमपीएससी मधील पदभरतीचा प्रश्न असो. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बेधडकपणे ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आता त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला आहे.

सामनाच्या अग्रलेखातून ओवैसी आणि त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात भाजपाच्या यशस्वी वाटचालीसाठी कामाला लागल्याचे म्हणत, ओवैसींना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून पाहिले जाईल, अशी टीका करण्यात आली आहे. याला उत्तर पडळकरांनी संजय राऊत यांना जनाब असे संबोधले आहे. महाविकास आघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि तुम्ही त्यांना खूश करण्यासाठी कोलांट्या उड्या मारता, हे रोजचं मनोरंजन बंद करा, असा टोलाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.

(हेही वाचाः मुलांना आमदार-खासदार करायला जागा आहेत, बहुजन समाजाने काय सतरंज्याच उचलायच्या का?)

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली

उद्धव सेनेचे ५६ आमदार हिंदुत्वासाठी निर्माण झालेल्या युतीच्या जीवावरच निवडून आले आहेत. हे कदाचित जनाब संजय राऊत विसरले असतील. त्यांनी ओवैसींची तुलना भाजपाचे अंगवस्त्र म्हणून केली आहे. पण याच ओवैसीला आलिंगन घालून मालेगावच्या सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला. एवढंच नाही तर अमरावती मनपातसुद्धा सत्तेसाठी स्वर्गीय बाळासाहेबांच्या विचारांना शिवसेनेकडून तिलांजली देण्यात आली, असा गंभीर आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नका

त्यामुळे आता ‘जनाब राऊत, एमआयएम की मुहब्बत कौन है?’ हे महाराष्ट्राला सांगायची आवश्यकता नाही. योगींनी मुख्यमंत्री बनू नये म्हणून शपथा घेणाऱ्यांना योगीजी बघून घेतील, त्यासाठी ते सक्षम आहेत. पण महाराष्ट्रातील हिंदूंना शिव्या देणा-या शर्जील उस्मानीसारख्या व्यक्तीवर तुम्हाला कारवाई करण्याची हिंमत होत नाही. अशी भेकड प्रवृत्ती असलेल्यांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवण्याची गरज नाही, अशी झणझणीत टीका पडळकरांनी केली आहे.

(हेही वाचाः धर्मांतरणाचे रॅकेट चालवणा-याला नाशिकमधून अटक! नाव बदलून रचला इस्लामीकरणाचा डाव)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here