कालिदास कोळंबकरांचे ‘ते’ स्वप्न आज पुन्हा पूर्ण झालंच

प्रती विधानसभेच्या अध्यक्ष पदावर भाजपचे वरिष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांना बसवण्यात आले.

कालिदास कोळंबकर… भाजपचे आमदार आणि राणेंचे कट्टर साथी अशी त्यांची ओळख. जिथे राणे तिथे कोळंबकर हे समीकरण ठरलेले. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर याच कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपची सत्ता आल्यानंतर सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य म्हणून कोळंबकर हे विधानसभा अध्यक्ष होतील, हे जवळपास निश्चित होते. मात्र सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपचे सरकार आले नाही आणि कोळंबकर यांचे विधानसभा अध्यक्ष होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. मात्र आज त्यांचे हे स्वप्न एक दिवस का होईना पूर्ण झाले आहे, तेही विरोधी बाकावर असताना.

अन् कोळंबकर झाले अध्यक्ष

12 आमदारांच्या निलंबनानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विधानसभेत किंवा विधान परिषदेत न जाता विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसूनच भाजपने प्रती विधानसभा भरवली. या प्रती विधानसभेच्या अध्यक्ष पदावर भाजपचे वरिष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांना बसवण्यात आले.

(हेही वाचाः आमदारांच्या निलंबन प्रकरणी भाजप उच्च न्यायालयात जाणार!)

याआधी कोळंबकर बनले होते हंगामी अध्यक्ष

सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली होती. निवडीनंतर त्यांनी सर्व आमदारांना शपथ दिली होती.

कोण आहेत कोळंबकर?

  • कालिदास कोळंबकर हे मुंबईतील वडाळा मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत.
  • सलग आठ वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
  • विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
  • नारायण राणेंचे कट्टर समर्थक म्हणून कोळंबकर यांची ओळख आहे.
  • नारायण राणेंसोबत त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

(हेही वाचाः विधानसभेत भास्कर जाधवांचे ‘माझी बॅट, माझी बॅटिंग’)

भास्कर जाधवांची टीका

भाजपच्या या अभिरुप विधानसभेवर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. संसदीय कार्यमंत्र्यांना बोलावून पायऱ्यांवर गदारोळ करणाऱ्यांना भाजप सदस्यांना विधानसभेत बोलवा, अशी मागणी त्यांनी केली. तसंच बेकायदेशीररित्या आंदोलन करणाऱ्या भाजप आमदारांचा स्पीकर जप्त करा, प्रती विधानसभेसाठी अध्यक्षांची परवानगी घेतली का ते पहा, नसेल तर संबंधितांवर कारवाई करा, असं ते म्हणाले. तसंच कोरोनामुळे शासनाने अधिवेशनावेळी इतके कडक निर्बंध लावलेले असताना माजी आमदार भाजपच्या प्रती विधानसभेत कसे, असे सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here