अस्लम शेख यांच्या खात्यात सामंतांची वाझेगिरी

अधिकाऱ्यांना वेठीला धरुन प्रसंगी दबाव टाकून या वसुलीच्या कामाला जुंपले जात आहे, असे पत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी अस्लम शेख यांना लिहिले आहे.

सचिन वाझे… राज्यात गेल्या काही दिवसांत सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव. सचिन वाझे प्रकरणामुळे ठाकरे सरकारची बदनामी झालेली असताना, आता अस्लम शेख यांच्या मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री यांच्या मत्स्य खात्यातच सध्या वाझेगिरी सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी याबाबत अस्लम शेख यांना पत्र देखील लिहिले आहे.

पालकमंत्र्याच्या भावाची वाझेगिरी

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण ३९५ अधिकृत पर्ससिन मच्छीमारांना परवाना देण्यात आला आहे. परंतु सध्या १५०० अनधिकृत पर्ससिन धारक तसेच ३०० एल.ई.डी. धारक बेकायदेशीररित्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मच्छीमारी करत आहेत. या अनधिकृत पर्ससिन व एल.ई.डी. धारक मच्छीमारांकडून दरमहा १० हजार रुपये, म्हणजेच महिन्याचे १ कोटी ८० लाख रुपये वसूल करण्याचे काम रत्नागिरी येथील किरण सामंत हे उघडपणे करत आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांना वेठीला धरुन प्रसंगी दबाव टाकून या वसुलीच्या कामाला जुंपले जात आहे, असे पत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी अस्लम शेख यांना लिहिले आहे.

(हेही वाचाः मंत्रालयात गटारी! कुणी रिचवल्या बाटल्या?)

काय आहे नितेश राणेंच्या पत्रात?

नितेश राणे यांनी अस्लम शेख यांना पत्र लिहिले असून, या पत्रात त्यांनी मत्स्य विभागात भ्रष्टाचार होत असल्याचे म्हटले आहे. कोकण किनारपट्टीवर अनधिकृतरित्या होत असलेल्या मच्छीमारीबाबत विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपारिक मच्छीमार सध्या फार मोठ्या संघर्षाद्वारे आपला निषेध वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत आहेत. पारंपारिक मच्छीमार व पर्ससिन मच्छीमार हा वाद जरी जूना असला, तरी सध्या हा वाद उफाळून येण्यामागे शासन निर्मित चाललेला भ्रष्टाचार हे एक कारण आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील मत्स्य विभागातील काही अधिकारी व मच्छीमार यांच्याकडून माहिती घेतली असता, आपल्या खात्यामध्ये उघडपणे चाललेल्या भ्रष्टाचाराची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

(हेही वाचाः रेल्वेपास मिळवण्यासाठी ‘ही’ आहे महापालिकेची नियमावली!)

तर हिंसक मार्ग निवडावा लागेल

रश्मी अंबुलकर नावाच्या अधिकाऱ्याने ६० अनधिकृत पर्ससिन धारकांवर कारवाई केली असता, त्यांची बदली अमरावती येथे करण्यात आली. अशी माहिती आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांकडून समजते. त्यामुळे अनधिकृत मच्छीमारी विरुद्ध कारवाई करण्यास अधिकारी वर्ग तयार होत नाहीत व यामुळेच संघर्ष निर्माण झाला आहे. अशाप्रकारे आपल्या खात्यामध्ये राजरोस बेकायदा वसुलीचा प्रकार चालू आहे. त्याची दखल घेऊन या भ्रष्टाचाराच्या मुळाशी आपण पोहचाल का? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत आपण वेळीच दखल घेऊन चौकशी करुन संबंधित बेकायदा हप्ते वसुली करणा-यांविरोधात लवकरच कारवाई करावी, अन्यथा कोकण किनारपट्टीवर पारंपारिक मच्छीमारांचा संघर्ष हा हिंसक मार्गावर जाईल व याची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.

ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये हस्तक्षेप, मच्छीमारांकडून होत असलेली वसुली आणि जिल्हा प्रशासनावर टाकलेला दबाव, या सर्व प्रकारचे पुरावे आणि व्हिडिओ आमच्याकडे आहेत. यावरुन ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सचिन वाझे झाले आणि त्यांना अटक करण्यात आली. त्याप्रमाणे आमचा कोकणाचा सचिन वाझे किरण सामंत तर नाही ना’, असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे.

-नितेश राणे, भाजप आमदार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here