राणेंचे महापौरांना पत्र! म्हणाले, एखादा पेंग्विन कमी पाळा पण…

अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे.

139

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील खड्ड्यांवरुन विरोधी पक्ष भाजपाने सत्ताधारी शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत. आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील मुंबई महापौरांना पत्र लिहून, आपल्या नेहमीच्या शैलीत टीका केली आहे. मुंबईकरांनी शिवसेनेवर सातत्त्याने विश्वास दाखवत त्यांना मुंबईत सत्ता दिली, पण शिवसेनेकडून मात्र कायमंच मुंबईकरांचा विश्वासघात करण्यात आला, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. तसेच एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबईकरांचा विश्वासघात

गेल्या तीस वर्षांपासून मुंबईकरांनी शिवसेनेच्या हातात मुंबई महापालिकेची एकहाती सत्ता दिली. परंतु या मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमंच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती. परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे.

(हेही वाचाः ‘पेंग्विन’च्या बालहट्टामुळे राणी बागेचे शुल्क वाढले! नितेश राणेंचा हल्लाबोल)

पैसा खड्ड्यात की कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात?

आज मुंबईकर वैतागून म्हणतोय एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा. आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी २२ हजार कोटी खर्च करुनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. मुंबई मनपानं सामान्यांनी आपल्या करातून दिलेला हा पैसा खड्ड्यात घातला की, कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात? असा प्रश्न सामान्य मुंबईकरांच्या मनात आहे. लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात. तेव्हा आमच्यावर दंडुकेशाहीचा गैरवापर करुन लाठी हल्ला केला जातो, अशी टीका राणेंनी महापौरांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

WhatsApp Image 2021 10 10 at 10.51.49 AMWhatsApp Image 2021 10 10 at 10.51.50 AM

आयुक्तांवर शिवसेनेचा दबाव?

मुंबईतील सत्ताधारी सेना जर कॉन्ट्रॅक्टरधार्जिणे निर्णय घेत असेल व आम्ही विचारलेल्या प्रश्नांना दाद देत नसेल तर लोकशाही मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. परंतु महापालिका आयुक्तही आमच्या युवा मोर्च्याच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत. याचा अर्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही सत्ताधारी सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय? किंवा त्यामुळेच भाजपा युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याची महापालिका आयुक्तांना भिती वाटतेय?, असा सवालही त्यांनी केला आहे.

(हेही वाचाः खोटं बोलणा-यांना त्यावेळी बाळासाहेबांनी काढून टाकले! उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला)

दिला थेट इशारा

सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मागणाऱ्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता तुम्ही दाखवली, तीच तत्परता रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आपण दाखवा. अन्यथा दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे भरण्यात ठोस पाऊल उचलले नाहीत, तर मी आणि माझे भाजपा युवा मोर्चाचे सहकारी यांना सोबत घेऊन मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी महापौरांना लिहिलेल्या पत्रात दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.