कोकणात राणेंनी ‘करुन दाखवले’!

जे कोकणात शिवसेनेला जमले नाही ते राणेंनी ‘करुन दाखवले’, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

91

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, तळकोकण अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा पाहता, परत एकदा आमदार नितेश राणे मदतीला धावून आले आहेत. सिंधुदुर्गासाठी १५ जंबो ऑक्सिजन सिलेंडर आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध करुन दिले आहेत. पुण्यावरुन भरलेले जंबो सिलेंडर घेऊन गाडी आज सिंधुदुर्गाकडे रवाना झाली. त्यामुळे जे कोकणात शिवसेनेला जमले नाही ते राणेंनी ‘करुन दाखवले’, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

रुग्णांचे वाचणार प्राण

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजनची कमतरता असल्याने याआधी आमदार नितेश राणे यांनी १०० पोर्टेबल ऑक्सिजन कॅन सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाला पाठवले. ज्याचा रुग्णांना मोठ्या प्रमाणावर  फायदा होत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावण्याच्या घटना राज्यात रोज घडत असून, अशी वेळ सिंधुदुर्गातील रुग्णांवर येऊ नये, यासाठी येत्या काही दिवसांत आणखी जंबो सिलेंडर सिंधुदुर्गासाठी पाठवणार असल्याची माहिती, आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. कोरोनाच्या या संकट काळात आमदार नितेश राणे यांनी केलेल्या या मदतीमुळे नक्कीच अनेक रुग्णांचे प्राण वाचणार आहेत.

याआधी आणले गुजरातहून बेड

याआधी नितेश राणे यांनी गुजरातहुन स्पेशल बेड मागवले होते. गुजरात राज्यातील आनंद युनिव्हर्सिटी मधील विद्यार्थ्यांनी हे स्पेशल बेड बनवले असून, थेट राजकोटहून देवगड आणि वैभववाडीत हे स्पेशल बेड पोचवण्यात आले आहेत. देवगड-जामसंडे आणि वैभववाडी नगरपंचायतच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या कोविड केअर सेंटरसाठी प्रत्येकी 50 बेड आमदार नितेश राणे उपलब्ध करुन देणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी 25 बेड देवगड-जामसंडे आणि वैभववाडी येथील कोविड केअर सेंटरला पोच झाले आहेत. कार्डबोर्डच्या बेड चा वापर मुंबई, पुणे महानगरपालिकांच्या कोविड केअर सेंटरमध्ये केला जात आहे. मुंबई पुण्याच्या धर्तीवर देवगड आणि वैभववाडी वासीयांनाही हे बेड मिळावेत, यासाठी आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला होता. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देवगड-जामसंडे आणि वैभववाडी नगरपंचायतच्या वतीने कोविडबाधितांसाठी कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल झालेल्या रुग्णांना आरामदायी वाटावे, यासाठी आमदार नितेश राणे यांनी थेट गुजरातहून हे बेड मागवले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण 50 बेड प्राप्त झाले असून, आणखी 50 बेड आमदार नितेश राणे उपलब्ध करुन देणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.