भाजपचे तडफदार आमदार नितेश राणे यांनी हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या विशेष मुलाखतीत ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला. राज्यातल्या अनेक प्रश्नांकडे राज्य सरकारचे कसं दुर्लक्ष होत आहे, याचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला. राज्यातल्या हिंदुंवर होणा-या अन्यायाबाबतही त्यांनी या मुलाखतीत परखड मत व्यक्त केले. राज्यातला हिंदू समाज धोक्यात आहे, हे सांगतानाच जे बाळासाहेब ठाकरे हिंदुंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, आज त्याच बाळासाहेबांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री असताना राज्यातील हिंदू वर्ग धोक्यात आहे, अशी जळजळीत टीका आमदार नितेश राणे यांनी केली.
महाराष्ट्राचे पश्चिम बंगाल होऊ शकते
राज्यातल्या हिंदूंवर जे हल्ले केले जात आहेत, ते पूर्वनियोजित आहेत. पश्चिम बंगालमध्ये तेथील हिंदुंवर ज्याप्रमाणे अत्याचार होत आहेत, त्याचंच प्रतिबिंब आपल्याला महाराष्ट्रात पहायला मिळत आहे, असे नितेश राणे म्हणाले. अन्य धर्मीयांचे सण, उत्सव येतात तेव्हा त्यांच्यावर कोणतीही बंधने घालण्यात येत नाहीत. इतर धर्मीयांच्या सणांना ज्याप्रमाणे सवलती दिल्या जातात त्या हिंदुंच्या सणांसाठी का दिल्या जात नाहीत, असा परखड सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईत हिंदुंची अवस्था पश्चिम बंगालमधील हिंदुंप्रमाणे झाली तर आश्चर्य वाटायला नको, असे विधान नितेश राणे यांनी केले.
ठाकरे मुख्यमंत्री असतानाही हिंदू धोक्यात
1993च्या दंगलीत शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राज्यातील हिंदुंच्या पाठीशी ठामपणे उभए राहिले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी मुंबई वाचवली होती, पण आज त्याच बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री असताना आज हिंदुंची ही परिस्थिती झाली आहे, ही मोठी शोकांतिका आहे अशी बोचरी टीकाही नितेश राणे यांनी केली.
फक्त हिंदू सणांवरच बंधने कशासाठी?
मुंबईच्या मालवणी परिसरात हिंदुंना आपली राहती घरे सोडण्यासाठी भाग पाडले जात आहे. मग पश्चिम बंगालप्रमाणेच मुंबईतल्या हिंदूंवरही अत्याचार झाले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आता हे सगळेच सेक्युलर झाले आहेत. आरती करण्यावर सुद्धा आता निर्बंध घालण्यात आले आहेत. लाऊडस्पीकरमुळे प्रदूषण होत असेल तर मग दिवसातून पाच वेळा लाऊडस्पीकर वाजतात त्यांचं काय? हे जर राजरोसपणे मुंबईत चालत असेल, तर मग सरकारच्या भूमिकेवर संशय येणं हे स्वाभाविक आहे, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.
संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा:
Join Our WhatsApp Community