अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येचा उलगडा होत नाही तोच आता त्याची पूर्व मॅनेजर दिशा सालियन हिच्या आत्महत्येचे नवीन गूढ निर्माण झाले आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा थेट संबंध असल्याचे म्हटले असून, या संदर्भात नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे.
काय म्हटले नितेश राणेंनी पत्रात
दिशा सालियनचा ‘लिव्ह इन पार्टनर’ रोहन रॉय याला सुरक्षा द्यावी, अशी विनंती भाजपा आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळी रोहन रॉय तिथे उपस्थित होता. त्यामुळे त्याचा जबाब दिशा सालियन आणि सुशांतच्या मृत्यूसाठी महत्त्वाचा आहे, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. रोहन रॉय हा जीवाच्या भीतीपोटी मुंबईतून आपल्या गावी निघून गेला आहे. त्याचा सीबीआयच्या चौकशीत जबाब महत्त्वाचा असल्याचे नितेश राणे यांनी अमित शहा यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. सीबीआय आणि एनसीबीच्या चौकशीत सत्य बाहेर येईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
८ जूनच्या पार्टीत काय घडले?
८ जून रोजी दिशा सालियान हिने आत्महत्या केली होती. त्यानंतर १४ जूनला सुशांतने देखील आत्महत्या केली. त्यामुळे दिशा सालियन आणि सुशांतच्या आत्महत्येचा थेट संबंध असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. ८ जूनला दिशा ज्या पार्टीत होती, तिथे तिच्यासोबत काही चुकीचे झाले होते. ती तिथून निघाली होती. त्यावेळी तिने सुशांतला फोनही केला होता. यावेळी दिशासोबत रोहन रॉय हा होता. दिशा इमारतीवरून पडली तेव्हा रोहन रॉय याने तातडीने खाली येणे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. रोहन रॉय हा तब्बल २५ मिनिटांनी खाली आला. त्यामुळे रोहन रॉयची सीबीआय चौकशी होणे गरजेचे असल्याचे नितेश राणे म्हणालेत.
मालवणी पोलिसांची भूमिका
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मोबाइल बिलाच्या सविस्तर तपशिलानुसार, त्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या फोनवर दिशा सालियनचा फोन आला होता. त्यामुळे तिच्या मृत्यूनंतर तिचा मोबाइल कोण वापरत होते, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र मालवणी पोलिसांनी तपासासाठी तो आपणच अॅक्टिव्ह केल्याचे स्पष्ट करत त्यात काहीच संशयास्पद नसल्याचे सांगितले होते. तसचे दिशा व सुशांतच्या मृत्यूचा परस्पर संबंध नसल्याचे यापूर्वीच पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तिच्या वडिलांनी मुलीची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची विनंती केली असून, पोलीस संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याबाबत विचार करत आहेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
Join Our WhatsApp Community