विरार येथील दुर्घटनेसाठी मंत्रालयीन चौकशी समितीची प्रसाद लाड यांची मागणी!

विजय वल्लभ रुग्णालय दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी, मंत्रालयीन चौकशी समिती नेमावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

70

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत १५ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. दोषींवर कारवाईची मागणी भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेच्या चौकशीसाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विरोध केला आहे. या दुर्घटनेची मंत्रालयीन समिती नेमून चौकशी व्हावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

समितीतील सदस्यांवरुन नाराजी

या समितीमध्ये वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त गंगाधरण देवराजन, पालघर जिल्हा वैद्यकीय अधिकारी दयानंद सूर्यवंशी, पोलिस उपायुक्त संजय पाटील व अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक बाब म्हणजे ज्यांच्या अक्षम्य दिरंगाई आणि बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली, ते वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी दिलीप पालव हे या समितीमध्ये आहेत. विविध राजकीय पक्ष, संघटना आणि स्थानिक नागरिक वसई-विरार महापालिकेतील आरोग्य यंत्रणेचे फायर ऑडिट करा, अशी मागणी करत होते. पण वसई-विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी दिलीप पालव यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन फायर ऑडिट केले नाही, असा आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.

(हेही वाचाः विजय वल्लभ अग्नितांडवः तपासात समोर आली रुग्णालयाची हलगर्जी! दोघांना अटक)

मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

अग्निशमन दलाच्या हलगर्जीमुळे ही घटना घडून यात निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या समितीकडून घटनेचा सखोल आणि निःपक्ष तपास होणार नाही याची काय खात्री आहे, असे परखड मत प्रसाद लाड यांनी व्यक्त केले. त्यामुळे विरार मधील विजय वल्लभ रुग्णालय दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी, मंत्रालयीन चौकशी समिती नेमावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.