‘केले तुका नि झाले माका’, ‘त्या’ १२ आमदारांवर संजय राऊतांची टीका

पाकिस्तान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सभागृहात बेशिस्तीचे प्रकार घडलेले आहेत. तसे प्रकार महाराष्ट्राच्या सभागृहात घडू नये, याकरता ही कारवाई करण्यात आली आहे, असे संजय राऊत म्हणाले.  

महाराष्ट्राच्या विधानसभेत जो प्रकार घडला आहे, तो महाराष्ट्रासाठी शोभनीय नव्हता. विरोधकांनी जो बाँम्ब आमच्यावर टाकायला आणला होता, तो त्यांच्याच हातात फुटला आहे. यावर मराठीत म्हण आहे. ‘केले तुका नि झाले माका’, अशी ‘त्या’ १२ आमदारांची अवस्था झाली, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली.

कारवाई शिस्तीचा भाग!

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव बसले होते, त्यावेळी त्यांचा माईक हिसकावून घेण्यापासून जे जे काही घडले, ते सर्व आपण सर्वांनी पाहिले आहे. भास्कर जाधव यांची भूमिका आहे कि, त्यांना शिवीगाळ करण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासात असे याआधी कधीच घडले नाही. योगायोगाने कालच सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला. त्यामध्ये सभागृहांमध्ये लोकप्रतिनिधींचे बेशिस्तीचे प्रकार सहन केले जाऊ नये, असे म्हटले आहे. ही कारवाई शिस्तीचा एक भाग होता. पाकिस्तान, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सभागृहात बेशिस्तीचे प्रकार घडलेले आहेत. तसे प्रकार महाराष्ट्राच्या सभागृहात घडू नये, याकरता ही कारवाई करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले.

(हेही वाचा : आता ‘त्या’ १२ आमदारांचा वाद पोहचला राज्यपालांच्या दरबारी!)

एक चूक महागात पडली!

भाजपने आमच्यावर बॉम्ब टाकायची तयारी केली होती, पण एक चूक त्यांना महागात पडली, बॉम्ब त्यांच्या हातात फुटला आहे. हे म्हणजे ‘केले तुका नि झाले माका’, अशी अवस्था झाली आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here