हे मुंबईचे दुर्दैव…असे भाजपावाले का म्हणतात?

मुंबईत जर असा प्रकार सुरू राहिल्यास आम्ही गप्प बसणार नाही.

99

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांवरुन ज्याप्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विशेष आढावा बैठक घ्यावी लागली, हे या मुंबईचे दुर्दैव आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आधी महापौरांना रस्त्यावर उतरावे लागले आणि बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांवरुन हरकतीचा मुद्दा घ्यावा लागला.

महापालिकेत २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षाला मुंबईत चांगल्या दर्जाचे रस्ते बनवता न आल्याने हे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्ष म्हणून महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांना अपयश आल्याने मुख्यमंत्र्यांना केवळ मुंबईतील खड्ड्यांबाबत विशेष सभा घ्यावी लागते, यापेक्षा मुंबईचे दुर्दैव काय असेल, असा सवाल भाजपा आमदार योगेश सागर यांनी केला.

(हेही वाचाः ‘शिवसेना’ लय भारी, ‘खड्ड्यात’ गेली जबाबदारी! मुंबईकरांचे रोजचे हाल दाखवणारा व्हिडिओ)

सत्ताधारी पक्षाचा अंधाधुंद कारभार

मुंबई महापालिकेच्या भाजपा पक्ष कार्यालयात बुधवारी आमदार योगेश सागर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मुंबईतील खड्ड्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी मुंबईत जर सत्ताधारी पक्ष अंधाधुंद कारभार करणार असेल तर तो चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईत खड्यांमुळे करदाते त्रस्त आहेत, खड्ड्यांवरुन महापौर किशोरी पेडणेकर यांना रस्त्यावर उतरावे लागले. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांना स्थायी समितीत खड्डयावरुनच हरकतीचा मुद्दा घ्यावा लागतो. तिथे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मुंबईतील खड्ड्यांबाबत विशेष बैठक घेऊन आढावा घेत आहेत, ही बाब दुखःद नाही का, असा सवालही सागर यांनी केला आहे.

(हेही वाचाः 31 हजार खड्डे बुजवले, तरी मुंबईकरांचे पाय खड्ड्यातच अडकले)

…तर न्यायालयातही जाऊ

हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या महापालिकेच्यावतीने खड्ड्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांना आढावा घ्यावा लागतो. त्यामुळे २० ते २५ वर्षे या महापालिकेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे हे मोठे अपयश असून, मुंबईकरांसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मुंबईत जर असा प्रकार सुरू राहिल्यास आम्ही गप्प बसणार नाही. आमचा हा संघर्ष पुढेही सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी प्रसंगी न्यायालयातही दाद मागू असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः अभियंत्यांना खड्डे पावले : इतर कामांमधून करणार कार्यमुक्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.