“…तो मला मारण्याचा कट होता”, शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर कंबोज यांची पोलिसांत तक्रार

169

हनुमान चालिसा पठणावरुन राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना या वाद रंगला असून शुक्रवारी रामा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहे. तेव्हा पासून मुंबईत नाट्यमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास भाजप नेते मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीसमोरून जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. इतकेच नाही तर त्यानंतर कंबोज मातोश्रीच्या परिसराची रेकी करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. या घटनेनंतर मोहित कंबोज यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून त्यांनी लेखी तक्रार नोंदवली आहे. मोहित कंबोज यांनी सांताक्रूझ पोलीस स्थानकात लेखी तक्रार नोंदवली. मातोश्री कलानगरबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या जमावाने त्यांना बळजबरीने गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.

पोलिसांत दाखल केली तक्रार

वांद्रे येथील कलानगरजवळच्या सिग्नलवरील सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन या घटनेतील सत्य समोर येऊ शकतं. या हल्ल्याचा राजकीय सूत्रधार कोण आहे? याचा तपास पोलिसांकडून करण्यात यावा. कलम 307,149,506(2)आयपीसी 34 अन्वये एफआयआर नोंदवून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी मोहित कंबोज यांनी तक्रारीतून मुंबई पोलिसांकडे केली आहे.

असे केले मोहित कंबोज यांनी ट्विट

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. या प्रकारानंतर मोहित कंबोज यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये कंबोज यांनी तक्रारीची प्रतही दिली असून ते ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्यावर काल जो हल्ला झाला, तो मला ठार मारण्याचा कट होता. मुंबई पोलिसांत मी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात यावी आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी माझी मागणी असेल. जर मला घाबरवण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत असेल तर मी सांगू इच्छितो की, मी तुम्हाला घाबरत नाही.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.