राज ठाकरेंना आव्हान देणा-या भाजप खासदाराने अनेकांना ‘असमान’ दाखवलं आहे

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अशी धमकी देणा-या भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. नुकताच मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलत राज ठाकरे यांनी आपला झंझावात पुन्हा सुरू केला आहे. राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या हिंदुत्वावरुन वाटचाल करत असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांचा अयोध्या दौरा जाहीर झाला आणि यावर शिक्कामोर्तब झाला. त्यामुळे त्यांच्या या दौ-याची राज्यातच नाही तर देशभरात चर्चा सुरू झाली.

पण त्यांच्या या दौ-याआधीच राज ठाकरे यांची वाट ब्रिजभूषण यांनी अडवली आणि सगळ्यांच्या नजरा उंचावल्या. हे ब्रिजभूषण नेमके आहेत तरी कोण ज्यांनी थेट राज ठाकरेंना आव्हान दिलं, असा प्रश्न सगळ्यांना पडला. पण राज ठाकरे यांच्याविरुद्ध दंड थोपटणा-या ब्रिजभूषण यांचं नाव कुस्तीच्या आखाड्यातही सन्मानानं घेतलं जातं.

(हेही वाचाः आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान)

मातीतला पहलवान

भाजपचे ब्रिजभूषण सिंह हे उत्तर प्रदेशच्या केसरगंज लोकसभा मतदारसंघातले खासदार आहेत. पण याआधी ते गोंडा मतदारसंघातून एकदा दोनदा नाही तब्बल सहा वेळा ते लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. उत्तर प्रदेशच्या गोंडा मतदारसंघात ब्रिजभूषण सिंह यांनी झेंडा गाढला आहे. राजकीय आखाडे गाजवणा-या ब्रिजभूषण यांनी राजकारणात येण्याआधी कुस्तीचे आखाडेही गाजवले आहेत. मातीतला पहलवान म्हणून ओळख असणा-या ब्रिजभूषण यांनी याआधी अनेकांना असमान दाखवलं आहे. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन करणं हे काही सिंह यांच्यासाठी नवीन नाही.

(हेही वाचाः महाराष्ट्रातलं रामराज्य देशात आणण्यासाठी अयोध्येला जाणार, ठाकरेंचा भाजपवर निशाणा)

बाबरी खटल्यातही नाव

राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर त्यांना आव्हान देणारे ब्रिजभूषण सिंह यांची सुद्धा प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळख आहे. बाबरी मशिद पाडल्याच्या खटल्यात आपलं नाव असल्याची माहितीही 2019 च्या निवडणुकीतील शपथपत्रात त्यांनी दिली आहे.

भाजपलाही ठोकला होता रामराम

ब्रिजभूषण सिंह यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला जय हिंद म्हणत ते समाजवादीच्या तिकीटावर निवडून आले. पण सायकलच्या सीटवर त्यांचं काही मन रमेना. त्यामुळे ते पुन्हा एकदा भाजपमध्ये आले आणि उत्तर प्रदेशातील गोंडा, बलरामपूर या मतदारसंघातून आपली ताकद दाखवून दिली.

(हेही वाचाः कोणाला कितीही विरोध करु द्या आम्ही अयोध्येत जाणारच; मनसे ठाम)

उत्तर भारतीयांचा अपमान जिव्हारी

ब्रिजभूषण यांचा शब्द उत्तर प्रदेशातील गोंडा आणि आसपासच्या परिसरात अंतिम मानला जातो. त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांना दिलेलं आव्हानाला महत्व दिलं जात आहे. भाजपचा राज ठाकरेंच्या दौ-याला विरोध नाही. पण राज ठाकरे यांनी सुरुवातीला उत्तर भारतीयांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेमुळे ब्रिजभूषण सिंह नाराज आहेत. राज यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध महाराष्ट्रात छेडलेल्या आंदोलनांमुळे उत्तर भारतीयांचा फार मोठा अपमान झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी माफी मागावी अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here