शिवसेना आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप हे दिवसेंदिवस वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. खासदार संजय राऊत यांच्याकडून भाजपवर होणा-या सततच्या टीकांवर भाजपकडूनही जशास तसे उत्तर देण्यात येते. राऊतांनी केलेल्या अशाच एका टीकेला आता भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊतांनी शिवसेनेला मागच्या बाकावर नेऊन बसवल्याची खोचक टीका शेट्टी यांनी केली आहे.
शिवसेना कुठे होती, आता कुठे आली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सल्ले घेत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला शेट्टी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. नरेंद्र मोदींनी आज आपल्या राजकीय कारकिर्दीत एक उंची गाठली आहे. संजय राऊत यांनीही शरद पवार यांच्याकडून सल्ले घेत असतात. पण शिवसेना कुठे होती आणि कुठे आली आहे. त्यामुळे सल्ला कोणाचा कोण घेतो यावर काहीही अवलंबून नसतं. एका शाळेत अनेक विद्यार्थी शिकत असतात त्यातले काही विद्यार्थी पुढे जातात, त्यानुसार नरेंद्र मोदी पुढे गेले. तर संजय राऊत यांनी मात्र शिवसेनेला मागच्या बाकावर नेऊन बसवलं, अशी टीका गोपाळ शेट्टी यांनी केली आहे.
(हेही वाचाः मुस्लिमांचाही राज ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला विरोध)
शिवसैनिकांमध्ये नाराजी
ही शोकांतिका आहे. राज्यात शिवसेनेची नाही तर शरद पवार यांची सत्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक वर्षांपासून मी शिवसैनिकांना ओळखतो. आजवर शिवसैनिकांना इतकं दुःखी मी कधीही पाहिलेलं नाही, असेही गोपाळ शेट्टी यांनी यावेळी म्हटले आहे.
(हेही वाचाः राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक! महाराष्ट्रातील या ‘सहा’ खासदारांचा समावेश)
Join Our WhatsApp Community