२०२४च्या लोकसभा निवडणुकीला दीड वर्षांचा अवधी बाकी आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपला नेता पुढचा मुख्यमंत्री होणार याची घाई लागलेली दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लागल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर बोलताना माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मोठे विधान केले आहे. ज्याप्रमाणे शिवसेना संपली, त्याप्रमाणे आता राष्ट्रवादी संपेल, असे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले.
रणजितसिंह निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये माढा तालुक्यातील भीमानगर येथे नीरा देवघर आणि उजनी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसोबत बोलताना खासदार निंबाळकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादीच्या बॅनरवॉरवरून निंबाळकर यांनी मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रात अनेक मुंगेरीलाल आहेत, असे म्हणत राष्ट्रवादींच्या नेत्यांची खिल्ली उडवली.
यामुळे राष्ट्रवादी सुरू आहे बॅनरबाजी
पुढे निंबाळकर म्हणाले की, ‘स्वप्न पाहणे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. ज्या पद्धतीने शिवसेना बस्ट झाली. शिवसेना पक्षही राहिला नाही आणि चिन्हही राहिले नाही. आता पुढच्या भविष्यात राष्ट्रवादीची अशी अवस्था होणार आहे, असे मी सूचक वक्तव्य करतो. राष्ट्रवादी पक्षच शिल्लक राहणार नाही, तर मग पुढे मुख्यमंत्री काय आणि मंत्री काय, त्यांना काहीच मिळणार नाही. पक्ष शिल्लक ठेवण्यासाठी त्यांची अस्तित्वाची लढाई चालली आहे. कार्यकर्त्यांमध्ये हुरुप राहावा म्हणून बॅनरबाजी सुरू आहे. याच्यात काही तथ्य नाही.’
(हेही वाचा – सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे ओवैसींकडे जातील; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका)
Join Our WhatsApp Community