राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप खासदार संभाजी राजे आक्रमक झाले असून, त्यांच्यात आणि भाजप नेत्यांमध्ये मतभेद वाढू लागले आहेत. त्याचमुळे राजे भाजपवर इतके का नाराज आहेत, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळेस पत्र लिहून त्यांच्या भेटीसाठी संभाजीराजांनी वेळ मागितली, पण तरीही मोदींनी त्यांना अजून वेळ दिली नाही. त्यामुळे संभाजी छत्रपतींनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आता तर राजे थेट टीका करू लागले आहेत. संभाजी राजे यांनी खासदारकी सोडण्याचे वक्तव्य भाजपविरोधी म्हणून पाहिले जात असून, तेव्हापासूनच भाजप आणि संभाजी छत्रपती यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली. एवढंच नाही तर संभाजी राजे हे मोदी विरोधी भूमिका घेत आहेत का? असा एक प्रश्नही सध्या कानावर येत आहे.
(हेही वाचाः मराठा आरक्षणासाठी आता ‘छत्रपतींचे’ मुख्यमंत्र्यांना पत्र!)
भाजप म्हणतंय आम्ही सन्मानच केला
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाने छत्रपती संभाजीराजे यांचा सन्मान केल्याचे गुरुवारी सांगितले. भाजप कार्यालयात येऊन अर्ज दाखल करावा लागू नये यासाठी त्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदार करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त्यानंतर अलाहाबाद येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत त्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी सत्कार केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सर्व केंद्रीय मंत्री व राष्ट्रीय नेत्यांनी उभे राहून त्यांचे अभिनंदन केले. केंद्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याकडे गेले असता खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मानच केला जातो. भाजपच्या राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड विकास परिषदेची स्थापना केली व त्या कामासाठी मोठा निधी दिला. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी पंतप्रधानांची भेट मागितली, तरी मराठा आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकारचा नसून राज्य सरकारचा आहे हे ध्यानात घ्यायला हवे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पक्षाचा बॅनर न घेता आंदोलनात उतरू
भारतीय जनता पक्ष राजकीय पक्ष म्हणून आंदोलन करणार नाही. मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन होईल त्यामध्ये आम्ही पक्षाचा बिल्ला आणि बॅनर बाजूला ठेऊन सहभागी होऊ. खासदार छत्रपती संभाजीराजे यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. त्यांनी त्यासाठी नेतृत्व करावे, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्याने आंदोलन केले तरी भाजप पाठिंबा देईल, असे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.
(हेही वाचाः मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्या! संभाजी राजेंचे शरद पवारांना आवाहन )
राजे पवार भेटीत दडलंय काय?
आज सकाळी संभाजी राजे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटांच्या या भेटीत नेमकं शिजलंय तरी काय, असा सवाल देखील उपस्थित होत आहे. यावर बोलताना संभाजी राजे म्हणाले की, गेल्या तीन-चार दिवसांपासून मी राज्यभरात फिरुन मराठा समाजाच्या भावना जाणून घेत आहे. आज शरद पवार यांना भेटलो तेव्हा मराठा समाज किती अस्वस्थ आणि दु:खी आहे, हे मी त्यांच्या कानावर घातले. त्यामुळे आता मराठा आरक्षणासाठी तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे या सगळ्या नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे. शरद पवार यांनी या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेन. त्यानंतर शुक्रवारी रात्री आठ वाजता मी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका जाहीर करेन, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community