पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. तर भाजपकडून समाधान औताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आता रंगणार आहे.
भालके विरुद्ध औताडे सामना रंगणार
पंढरपूर मतदारसंघाचे आमदार दिवंगत भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर, त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. तर समाधान औताडे यांना भाजपच्या केंद्रीय सांसदीय मंडळाने ही उमेदवारी जाहीर केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
(हेही वाचाः मिठी नदीत मिळालेल्या नंबर प्लेटचे काय आहे औरंगाबाद कनेक्शन?)
कोण आहेत समाधान औताडे?
समाधान औताडे हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले असून, ते बांधकाम व्यवसायिक आहेत. तसेच ते साखर निर्मिती उद्योगात सुद्धा ते कार्यरत आहेत. सोलापूर येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालकपद ते भूषवत असून सोलापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून औताडे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंगळवेढा तालुक्यात त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्य, वैद्यकीय तसेच रोजगार शिबिरांचे आयोजन केले आहे. लॉकडाऊन काळात औताडे यांनी विविध माध्यमातून गरजू समाज घटकांना सहाय्य केले आहे. तसेच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठीही औताडे विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करत असतात.
Join Our WhatsApp Community