राज्यातील शिवसेना आणि भाजपमधील वाद दिवसेंदिवस चांगलाच रंगताना दिसतोय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह विधान केले आहे. या विधानानंतर पेडणेकरांनी शेलारांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर शेलार यांनीही हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज उच्च न्यायालयात सादर केला. यानंतर देखील शिवसेनेने आशिष शेलारांच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी करत त्यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.
नितेश राणेंकडून शेलारांची पाठराखण
सेना-भाजपमधील वाद कमी होत असतानाच सेनेने आता पुन्हा एकदा शेलार आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारे बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालयासमोरच लावले आहे. या बॅनरवर आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आली आहे. त्यामुळे आता या वादात भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत आशिष शेलारांची पाठराखण केली आहे.
(हेही वाचा – तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार आंगणेवाडीच्या भराडी देवीचा यात्रोत्सव)
@ShivSena pic.twitter.com/6Q7G2JSPqp
— nitesh rane (@NiteshNRane) December 12, 2021
काय म्हणाले नितेश राणे?
दरम्यान, या बॅनरबाजीवरुन भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. ”किशोरी ताईबद्दल जे आशिष शेलार यांनी म्हटलेलं नाही त्याबद्दल शिवसेनेला जास्तच मर्दानगी सुचलेली आहे. रात्रीच्या वेळेस यायचे बँनर लावायचे आणि स्वतःला वाघ म्हणून म्याव म्याव करायचं ही आता शिवसेना झालेली आहे. नाच्याचा उरलेला पक्ष शिवसेना ज्या पक्षात वरपासून खालपर्यत सर्व नाचेच भरलेले आहेत. पुढच्या वेळी बॅनर लावताना ज्यांनी बॅनर लावलेत त्यांची खाली नावे दिली असती तर नाचे कशाला म्हणतात, हे आम्ही दाखवून देऊ,” असे म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.