गेल्या महिन्यात मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. गेली पाच वर्षे उड्डाणपुलाचे काम रखडले होते. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतरही हा उड्डाणपूल केवळ हलक्या वाहनांसाठी सुरू केला आणि अवजड वाहनांना या उड्डाणपुलावर प्रवेश दिला नाही. हा पूल अवजड वाहनांचा भार घेण्यास अद्याप सक्षम झालेला नसतानाही उद्घाटनाची घाई कशासाठी, असा सवालही भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला.
हरकतीचा मुद्दा राखून ठेवला
घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाणपुलावर दुचाकी घसरल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. त्याला सत्ताधाऱ्यांची असंवेदनशीलता, दुर्लक्ष व निष्काळजीपणा जबाबदार असून, दुर्दैवी तरुणाचा बळी गेल्यानंतर महापालिकेला उड्डाणपुलाच्या दुरुस्तीबाबत जाग आल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे स्थायी समितीत केली. त्यावर सविस्तर लेखी उत्तर मिळेपर्यंत हरकतीचा मुद्दा अध्यक्ष यशवंत जाधव यांनी राखून ठेवला.
(हेही वाचाः गणेशोत्सव मंडळांनो, ‘या’ पुलांवर मिरवणुका नेऊ नका! )
प्रशासन व कंत्राटदाराला जबाबदार ठरवा
१ ऑगस्ट रोजी या पुलाच्या उद्घाटनपर भाषणात दस्तुरखुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पुलाच्या दर्जाबाबत भारतीय जनता पक्षाकडून महापौर, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांना पत्र लिहूनही त्याबाबत अक्षम्य दुर्लक्षच करण्यात आले आहे. उड्डाणपुलावर रस्ता असमतोल असून त्याच्या दर्जाबाबत सुधारणा करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, बेजबाबदार प्रशासनाच्या कानापर्यंत या सूचना पोहोचल्याच नाहीत. त्याचा परिणाम म्हणून एका दुर्दैवी तरुणाचा बळी गेला असल्याचे सांगत भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उड्डाणपुलावरील बळी गेलेला तरुणाच्या अपघाताबद्दल प्रशासनाला व कंत्राटदाराला जबाबदार धरावे, अशी मागणी केली आहे.
उद्घाटनाची घाई कशासाठी?
गेली पाच वर्षे उड्डाणपुलाचे काम रखडले होते. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतरही हा उड्डाणपूल केवळ हलक्या वाहनांसाठी सुरू केला आणि अवजड वाहनांना या उड्डाणपुलावर प्रवेश दिला नाही. हा पूल अवजड वाहनांचा भार घेण्यास अद्याप सक्षम झालेला नसताना, उद्घाटनाची घाई कशासाठी? असा सवालही गटनेते शिंदे यांनी उपस्थित केला. प्रशासन आता या पुलावरील दोन्ही बाजूला ५०० मीटर अंतरावर गतिरोधक बसवणे आणि रम्बरर्स बसवण्याचे काम हाती घेत आहे.
(हेही वाचाः घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाणपुलाचा वेग मंदावणार! ‘ही’ आहेत कारणे…!)
खर्च वाढला तरीही कामाचा दर्जा…
उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यास कंत्राटदाराला विलंब लागूनही त्याला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून पाठीशी घातले जात आहे. अद्यापही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तीन वर्षे विलंब, दोन वेळा कंत्राटात फेरफार, ३०० कोटीच्या मूळ कंत्राट किंमतीत वाढ आणि एकूण सातशे कोटी रुपये खर्च होऊनही उड्डाणपुलाच्या दर्जाबाबत साशंकता असेल तर हे मुंबईकरांचे दुर्दैव आहे, असे भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले.
उद्घाटनाची घाई, पण नामकरणास दिरंगाई
९ डिसेंबर २०२१ रोजी खासदार मनोज कोटक यांनी या उड्डाणपुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. हा प्रस्ताव जून २०२१च्या कार्यक्रम पत्रिकेवर आला. १ ऑगस्ट २०२१ला पुलाचे उद्घाटन झाले. परंतु आज १ सप्टेंबर उजाडला असतानाही उड्डाणपुलाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे करण्यात आलेले नाही, असा निषेधही भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केला.
Join Our WhatsApp Community