आता भाजप फ्रंटफूटवर : रश्मी ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल!

दैनिक 'सामना' मध्ये अग्रलेखात केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका केली आहे. त्यामुळे संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांच्या विरोधात नाशिकच्या सरकार वाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे अटकेचे नाट्य संपल्यावर भाजप आता फ्रंटफूटवर आली आहे. त्यासाठी भाजपने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना लक्ष्य केले. २५ ऑगस्ट रोजी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’ मध्ये अग्रलेखात केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर अत्यंत हीन दर्जाची टीका केली आहे. त्यामुळे संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांच्या विरोधात नाशिकच्या सरकार वाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काय म्हटले आहे तक्रारीत? 

तक्रारदार  हे शिवाजी निवृत्त बरके आहेत. ज्यांच्याविरोधात तक्रार करायची आहे, त्या रश्मी ठाकरे ह्या दैनिक ‘सामना’च्या संपादक आहेत, तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे दैनिकाच्या अग्रलेखात छापल्या जाणाऱ्या मजकुराची सर्व जबाबदारी हे त्यांचीच आहे. दैनिक सामानाचा २५ ऑगस्ट रोजीचा ‘भोके पडलेला फुगा’ या शीर्षकाखालील अग्रलेख प्रसिद्ध झाला. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविषयी अत्यंत बेताल आणि त्यांची प्रतिमा मलीन करणारी वक्तव्य करण्यात आली आहेत. या अग्रलेखात नारायण राणे यांचा उल्लेख ‘बेडूक, छपरी, गँगस्टर, उपटशुंभ, सरडा, भाडोत्री, नागडा’, अशा अत्यंत अशोभनीय आणि अब्रूस बदनामीकारक शब्दांचा वापर करून चिखलफेक करण्यात आली आहे. या शब्दप्रयोगामुळे केंद्रीय मंत्री राणे यांच्या घटनात्मक पदाचा अवमान केला आहे. तर या अग्रलेखाच्या प्रति छापून नाशिक महापालिकेचे विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांनी अधिक अवमान केला आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे आणि अजय बोरस्ते यांच्या विरोधात फोजदारी कारवाई करावी.

(हेही वाचा : भाजपचे आता मिशन ‘परब’)

काय म्हटले आहे अग्रलेखात? 

पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या महात्मा नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणं असं विधान केलं असतं तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे. महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे व एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे कृतीनं दाखवून द्यायची हीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गानं उखडलेलेच बरे! पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?) आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारनं तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचं दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवळायची काय? महात्मा नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करुन सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केंद्रीय मंत्री नारोबा राणे यांनी शपथग्रहण केल्यापासून जे दिवे पेटवले व अक्कल पाजळली त्यामुळे केंद्र सरकारची मान शरमेनं खाली झुकली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here