शेतक-यांची वीज कापली तर खबरदार…विरोधकांचा इशारा

118

कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी गावातील शेतकरी सूरज जाधव यांनी फेसबुकचे थेट प्रक्षेपण करून आत्महत्या केली होती. याचे पडसाद ७ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले. कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीची प्रचंड हानी होत असून शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे सरकारने राज्यातील शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी तोडू नये, तसेच कृषी पंपांचा वीज पुरवठा सुरळीत करावा, या प्रमुख मागण्यांसाठी विरोधकांनी विधानसभेत गदारोळ घातला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज प्रथम १० मिनिटे आणि नंतर ३० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. विधानसभेत प्रारंभी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय मांडला. नंतर याच विषयाच्या लक्षवेधीवर सभागृहात चर्चा करण्यात आली.

सरकारला शेतकर्‍यांची काळजी नाही!

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सूरज जाधवसारखे शेतकरी आत्महत्या करत असतांना सरकारला शेतकर्‍यांची काळजी नाही. आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा सामना आणि आता हे सुल्तानी संकट यामुळेच राज्यातील शेतकरी आत्महत्या संख्या वाढत आहे. त्यामुळे कृषी पंपांची वीज जोडणी न कापण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी द्यावेत. रब्बी हंगामातील पिके जोमात असतांनाच कृषी पंपाचा विद्युत् पुरवठा खंडित केला जात आहे. शिवाय थकबाकीपोटी सक्तीचे वीज देयक वसुलीही केली जात असल्याने शेतकर्‍यांसमोर दुहेरी संकट ओढावले आहे. प्रतिवर्षी उत्पादनात घट, वाढते कर्ज आणि यंदा पाणी असूनही केवळ कृषी पंपाचा विद्युत् पुरवठा खंडीत केल्याने पिकांना पाणी देता येत नाही. सूरज जाधवच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कृषी पंपाचा विद्युत् पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्यांनी केली.

(हेही वाचा आतापर्यंत प्रभाग रचनेचे झालेले काम बनले रद्दी, पुनःश्च हरिओम!)

शेतकर्‍यांची वीज जोडणी तोडण्यावर ठाम!

विरोधकांनी अनेकादा मागणी करूनही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जे शेतकरी वीजदेयक भरणार नाहीत, त्यांची वीज जोडणी कापण्यात येईल, असे सूचित करून ते स्वतःच्या मताशी ठाम राहिले. ते म्हणाले की, शेतकर्‍यांचे वीज देयक भरण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने सप्टेंबर २०२० अखेर ४४ कोटी ४९ लाख ४९५ रुपयांची वीज थकबाकी आहे. शेतकर्‍यांना टप्पाटप्याने वीज देयक भरण्यास अनुमती देण्यात आली आहे; मात्र वारंंवार विनंती आणि नोटीस देऊनही वीज देयक न भरणार्‍या शेतकर्‍यांची वीज जोडणी कापण्यात येत आहे. ही कारवाई चालूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.