पवई तलावातील सायकल ट्रॅकची हवा भाजपा काढणार!

जे सायकल ट्रॅक तलावाच्या भागात बनवण्यात येत आहेत ते काम त्वरित थांबवून पाईप लाईनच्या बाजूने जसे सायकल ट्रॅक बनवण्यात येणार होते, तसे बनवावे, अशी सूचना कोटक यांनी केली.

93

पवई तलावाच्या सभोवताली पाणलोट क्षेत्रात भराव घालून सायकल ट्रॅक बनवण्याचे काम मुंबई महापालिकेमार्फत हाती घेण्यात येत आहे. या कामासाठी पवई तलावाच्या त्रिज्या कमी करत आकार छोटा केला जात आहे. यामुळे पवई तलावाच्या नैसर्गिक सौंदर्यास बाधा येणार आहे. मुंबई महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता सायकल ट्रॅकच्या कामावर काही शेकडो कोटी रुपये खर्च करणे संयुक्तीक ठरणार नसल्याचे सांगत भाजपाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील सायकल ट्रॅकची हवा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

तलावाच्या सभोवताली भराव घालून सायकल ट्रॅकचे काम

ईशान्य मुंबईचे भाजपा खासदार मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली पवई भागातील नगरसेवकांसह महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची भेट घेऊन पवई तलावासारख्या हेरिटेज दर्जाच्या पाणथळ क्षेत्राचे जतन आणि संरक्षण करणे तसेच पर्यावरणाचे संवर्धन करणेबाबत निवेदन दिले. पवई तलावाच्या सभोवताली पाणलोट क्षेत्रात भराव घालून सायकल ट्रॅक करण्याचे काम मुंबई महापालिकेमार्फत हाती घेण्यात येत आहे. या कामामुळे पवई तलावाच्या नैसर्गिक सौंदर्यास बाधा येणार आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होईल, असे मत विविध स्वयंसेवी संघटनांनी व्यक्त केले आहे. पवई तलावासारख्या हेरिटेज दर्जाच्या पाणथळ क्षेत्राचे जतन आणि संरक्षण करणे, तसेच पर्यावरणाचे संवर्धन करणे जेणेकरून सायकल ट्रॅकच्या कामामुळे त्यात कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेणे हे महापालिकेचे आद्य कर्तव्य ठरते, याची जाणीव करून दिली.

(हेही वाचा : मासेमारी कायद्यातील बदल हा भ्रष्टाचारास मुभा देणारा!)

तलावात उगवलेल्या वनस्पती, चिखलांमुळे पाणलोट क्षेत्रात अडथळा

मुंबई महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता सायकल ट्रॅकच्या कामावर काही शेकडो कोटी रुपये खर्च करणे संयुक्तीक ठरणार नाही. मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि वाहनांच्या वर्दळीच्या शहरात परदेशाप्रमाणे सायकल ट्रॅक तयार करून सायकलचा वापर करणे संभव होईल, अशी कोणतीही शक्यता वाटत नाही. जे सायकल ट्रॅक तलावाच्या भागात बनवण्यात येत आहेत ते काम त्वरित थांबवून पाईप लाईनच्या बाजूने जसे आधी बनवण्यात येणार होते, तसे बनवावे, अशी सूचना कोटक यांनी केली. तलावात सोडण्यात येणाऱ्या सर्व सांडपाण्याचे रस्ते त्वरित बंद करण्यात यावे. तलावामध्ये उगवलेल्या वनस्पती आणि चिखलामुळे पाणलोट क्षेत्रात अडथळा निर्माण होतो, तरी या वनस्पती त्वरित साफ करण्यात याव्यात आणि वृक्षतोड झालेली झाडांच्या जागी नवीन वृक्षारोपण करण्यात यावे. बिबट्यांना वावरण्यासाठी व मगरींच्या संवर्धनासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी आणि पवई तलाव मुंबईमध्ये एकमेव गोड पाण्याचा तलाव लोकांच्या पर्यटनासाठी आहे तिथे जास्तीत जास्त वृक्षारोपण करून लोकांसाठी एक सुसज्ज पर्यटनस्थळ बनविण्यासाठी प्रयत्न व्हावा. आपण स्वत: जातीनिशी लक्ष घालून तसेच योग्य तो पर्यावरणीय सल्ला घेऊन पुढील पाऊले उचलावीत, अशीही सूचना केली.

भराव टाकून तलावाचा आकार कमी करण्यास विरोध

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना, सायकल ट्रॅकसाठी वेगळ्या प्रकारचा भराव टाकला जाणार आहे. हा भराव टाकून तलावाचा आकार कमी केला जाणार आहे, याला आपला विरोध आहे. उद्या जर यातील मगरी सायकल ट्रॅकच्या मार्गावर आल्या, तर काय करायचे, असा सवाल कोटक यांनी केला. तलावात रहेजा आणि हिरानंदानी सह आयआयटीचेही सांडपाणी सोडले जाते. जे काही १७ सांडपाण्यांचे प्रवेश मार्ग आहेत, ते येत्या सहा महिन्यांत बंद केले जातील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासु यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सांडपाण्याचे प्रवेशमार्ग बंद करून तलावातील प्रदुषण बंद करण्याची प्रक्रिया राबवली जावी, अशा सूचना कोटक यांनी करून काही धनाढ्य लोकांचे चोचले पुरवण्यासाठी या तलावाचा आकार कमी करणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.