मुंबई महानगरपालिकेने गेल्या तीन महिन्यात आठ हजार खड्डे बुजविण्याचा दावा केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत दहा हजार खड्डे बुजविण्यात आले होते. हे खड्डे बुजवून मुंबई महानगरपालिकेने यंदा कमी खड्डे पडले असल्याचं भाकीत जरी केलं असलं तरी मुंबई आणि मुंबई उपनगरातल्या रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिका प्रशासनाला दिसत नाहीत का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
प्रत्येक विभागाला पालिकेकडून दोन करोडचा निधी खड्डे बुजविण्यासाठी दिला जात आहे. परंतु हा निधी नेमका जातोय तरी कुठे? असा सवाल उपस्थित होतोय. मुलुंड शहरांमध्ये देखील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असताना देखील ते अद्यापही पालिका प्रशासनाला बुजविता आलेले नाहीत. आज बुधवारी, भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुलुंडमध्ये नगरसेवक प्रकाश गंगाधरे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी एक अनोखे आंदोलन केले. मुलुंडच्या नाहूर जंक्शन परिसरामध्ये भाजप तर्फे पोटहोल यात्रा काढण्यात आली.
(हेही वाचा – रिया चक्रवर्तीने गांजा खरेदी करुन सुशांतला दिला, NCB चा मोठा खुलासा)
पालिका आयुक्त चहल यांच्या फोटो सोबत ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्यात आले आणि पालिका प्रशासनाला रस्त्यांवर पडलेले खड्डे निदर्शनास आणून दिले. यावेळी पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. रस्त्यांवर फारसे खड्डे पडले नसल्याचा दावा मुंबई महानगरपालिका करते. परंतु प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळच आहे हे खड्डे बुजविण्याच्या ऐवजी पालिका आपले हात झटकत आहे. सोबतच जो करोडोंचा निधी पालिका प्रशासनाने या खड्डे बुजविण्यासाठी दिला आहे. तो नेमका कुणाच्या खिशात जातोय. या खड्ड्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाशी कोण खेळतंय. याचा शोध घेतला पाहिजे आणि त्यासाठी मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार मुक्त करणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी मा. नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी दिली. या आंदोलनाच्या वेळी भाजपाचे राजेंद्र मोहिते, सानिका चव्हाण, जयश्री बलेकर यांच्यासोबत मन मंदिर सोसायटीचे पदाधिकारी देखील उपस्थितीत होते.
Join Our WhatsApp Community