येत्या काळात देशात भाजपाच टिकेल, इतर पक्ष संपतील, असे विधान ८-१० दिवसापूंर्वी भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. ते लोकशाहीला घातक असून, आपण पुन्हा गुलामगिरीकडे चाललो आहोत का, असा विचार यानिमित्ताने येतो. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावात किती कुळे आहेत माहिती नाही, पण कितीही कुळे आली तरी शिवसेना संपणार नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली.
व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’च्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे बोलत होते. या वेळी त्यांनी भाजपासह नव्या सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा. एकीकडे घरोघरी तिरंगा लावण्याची मोहीम राबवली जात असताना, दुसरीकडे लष्करात कपात करण्याची बातमी धक्कादायक आहे. चीन किंवा अमेरिका यांनी आधुनिकीकरणासाठी सैन्यात कपात केल्याचे ऐकीवात नाही. सरकार पाडायला पैसे आहेत, पण लष्करासाठी नाहीत, अशी आजची स्थिती आहे. नुसता घरावर तिरंगा लावून चीन परत जाणार का, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज्यात आपत्ती असताना मंत्र्यांची मौज सुरू
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने मुंबई मिळवली, तरी मराठी माणसावरील अन्याय कमी झाला नव्हता. त्याला वाचा फोडण्याचे काम मार्मिकने केले. आता व्यंगचित्रकार किती, हा वादाचा विषय, पण व्यंगचित्रकार असायलाच हवा. महाराजांच्या काळात शाहीर जे काम करायचे, ते सामर्थ्य व्यंगचित्रकाराच्या रेषेत आहे, असे उद्धव यांनी सांगितले. मला आज राजकीय बोलायचे नाही, पण महाराष्ट्रात आपत्ती असताना सरकारचा पत्ता नाही. मंत्र्यांची मौज-मजा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
आजच्या परिस्थितीवरही व्यंगचित्रे काढा…
म्हणता म्हणता मी आणि मार्मिक ६२ वर्षांचे झालो. पण मार्मिक आजही चिरतरुण आहे. प्रबोधनकार आणि बाळासाहेब म्हणायचे, विचाराने माणूस थकता कामा नये. व्यंगचित्र काय करु शकते, याचे उदाहरण म्हणजे शिवसेना. मार्मिकने शिवसेनेची बीजे पेरली, अस्वस्थ मने हेरली आणि शिवसेना जन्मली. १९६० साली मार्मिकचा जन्म झाला, तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळून १३ वर्षे झाली होती. आज सरकार घरोघरी तिरंगा लावा म्हणत असताना, कित्येकांकडे तिरंगा आहे पण घर नाही, अशी स्थिती आहे. दुसऱ्या महायुद्धात हिटलर बाँम्ब टाकायचा आणि डेव्हिड लो व्यंगचित्र काढायचे. त्यामुळे तो त्रस्त झाला. ही व्यंगचित्रकाराची शक्ती. व्यंगचित्रकारांनी आजच्या परिस्थितीवरही व्यंगचित्रे काढावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
Join Our WhatsApp Community