मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून राज्यभरात ठिकठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाने देखील या आंदोलनात सहभाग घेतला होता. लालबाग, कल्याण, ठाणे, येवला आदी ठिकाणी आंदोलन करत भाजपने राहुल गांधींचा तीव्र शब्दात धिक्कार केला.
लालबागमध्ये राहुल गांधींविरोधात केलेल्या आंदोलनात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले होते. ठाण्यात कोर्ट नाका येथे झालेल्या आंदोलनात भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ओबीसी समाजही सहभागी झाला होता. या आंदोलनात माजी ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, मनोहर डुंबरे, संजय वाघुले आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तसेच राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप कल्याण जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील, शहराध्यक्ष अभिजीत करंजुले, नाना सूर्यवंशी,संजय आदक, नगरसेविका पाटील, संतोष शिंदे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
शिवाय येवला भाजपाच्या वतीने अटलबिहारी वाजपेयी चौक विंचूर चौफुली येथे राहुल गांधींविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी राहुल गांधींच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
(हेही वाचा – राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याला दिले आव्हान; केरळच्या महिलेची सर्वोच्च न्यायालयात धाव)
Join Our WhatsApp Community