सुहास शेलार
मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लांबत चालल्याने एकीकडे आमदारांच्या गोटात अस्वस्थता वाढत असताना, आता महामंडळ वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाआधी त्याची घोषणा केली जाईल. दोन्ही पक्षांत ६०:४० असा फॉर्मुला ठरला असून, यात समन्वय ठेवण्यासाठी भाजपाकडून मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून ९ आणि शिवसेनेच्या ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी अनेकजण नाराज झाल्याने पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात सामावून घेण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र, इच्छुकांची संख्या अधिक आणि पदे कमी असल्याने शिंदेंसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी आमदारांची नाराजी पुन्हा उफाळून येऊ नये, यासाठी काहींना चांगल्या महामंडळाचे आश्वासन, तर काहींना संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी देण्याचे ठरवण्यात आले आहे.
(हेही वाचा – अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात अमित शहांची तोफ धडाडणार)
राज्यात एकूण १२० महामंडळे आहेत. त्यापैकी ६० महामंडळे ‘मलईदार’ मानली जातात. पहिल्या टप्प्यात या ६० महामंडळांचे वाटप केले जाणार आहे. त्यापैकी ६० टक्के म्हणजे ३६ भाजपाला, तर २४ महामंडळे शिंदे गटाला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पावसाळी अधिवेशनाआधी महामंडळांचे वाटप केले जाईल. दोन टर्म किंवा त्याहून अधिक काळ निवडून आलेले आमदार, ज्यांचा मंत्रिमंडळात समावेश करता येणार नाही, अशांना महामंडळ वाटपात प्राधान्य दिले जाणार असल्याचे कळते.
यांची नावे चर्चेत
शिवसेनेकडून अनिल बाबर, शहाजी पाटील, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, किशोर जोरगेवार, मंजुळा गावित यांची नावे महामंडळांसाठी चर्चेत आहेत. भाजपाकडून कोणाला संधी मिळणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community