भाजपा-शिवसेना युतीचा उमेदवार ठरला; ‘अंधेरी पूर्व’मधून यांना संधी…

125
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना युतीने आपला उमेदवार निश्चित केला आहे.
आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला पोटनिवडणुकीत उतरवण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, शिंदे गट आणि भाजपाच्या युतीमध्ये हा मतदारसंघ कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. किंबहुना लटके यांचे एकेकाळचे मित्र सुनील यादव यांच्या पत्नीलाच मैदानात उतरवले जाईल, असाही कयास बांधला जात होता.
मात्र, शिंदे गटाने हा मतदारसंघ भाजपाला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, भाजपाने आपला उमेदवार उतरवण्याचे निश्चित केले आहे. माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी नुकतेच त्याबाबतचे सूतोवाच केले.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वसंध्येला भाजपाने अंधेरी पूर्व येथे निवडणूक मध्यवर्ती कार्यालय सुरू केले. या कार्यालयातून सर्व राजकीय डावपेच आखले जाणार आहेत. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रविवारी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेलार यांनी अधिकृत उमेदवाराबाबत सूतोवाच केले. भाजप आणि शिंदे गट युतीचे उमेदवार मुरजीभाई पटेल यांना स्थानिकांचा भरघोस पाठिंबा असल्याचे यावेळी दिसले, असे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.