मुंबईतील २२७ विभागांमध्ये गुंजणार वीर सावरकर लिखित शिवरायांची आरती

286

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या शिवरायांवरील आरतीचा जयघोष मुंबईतील सर्व २२७ विभागांमध्ये गुंजणार आहे. हिंदवी स्वराजाचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३व्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी मुंबईत सर्वत्र ‘जय जय शिवराया…’ ही आरती म्हटली जाणार आहे.

मुंबईत भाजपतर्फे २२७ विभागांमध्ये शिवजयंती कार्यक्रम होत असून भाजपकडून ३४६ ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आरतीचा महा जयघोष करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी, १६ फेब्रुवारी रोजी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मान सोहळ्यात आमच्या राजकीय विरोधकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपातर्फे दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र,‍ दिवाळी उत्सव जोरदार साजरे करण्यात आले, त्याचप्रमाणे आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही मोठ्या उत्साहात मुंबईत साजरी करण्यात येणार आहे. या निमित्त मुंबईत प्रत्येक विभागामध्ये नाक्यानाक्यावर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून, प्रत्येक ठिकाणी ‘जय जय शिवराया’ या वीर सावरकर यांनी लिहिलेल्या आरतीचा जयघोष करुन वीर सावरकरांचाही सन्मान करण्यात येणार आहे. (हेही वाचा ‘आरे’ तील वृक्षतोडीला राज्य सरकारने याचिकाकर्त्यालाच ठरवले जबाबदार)

मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडून दाखवणारे देखावे, चित्रप्रदर्शन, शिवव्याख्याने, गरिबांना विविध स्वरुपात मदत, महाराष्ट्राच्या लोकधारेतील सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी कार्यक्रम, विविध स्पर्धा, मिरवणुका, भव्य देखावे, किल्ले दर्शन, शस्त्र प्रदर्शन, अशा विविध कार्यक्रमांनी मुंबई दुमदुमून जाणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातून प्रेरणा घेऊन भारतीय नौदलाचे नवे बोधचिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आले असून, त्याची माहितीही आम्ही जनतेपर्यंत पोहचवणार आहोत, अशी माहिती शेलार यांनी दिली.

३४६ ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन

उत्तर पश्चिम जिल्ह्यात ५८, उत्तर पूर्व ५०, उत्तर मध्य ६३, उत्तर मुंबई ६९, दक्षिण मध्य ४४, दक्षिण मुंबई ६२, असे एकूण ३४६ ठिकाणी शिवजयंती कार्यक्रम साजरा होणार आहे. यातील ३६ ठिकाणी भव्य स्वरुपात कार्यक्रम होणार आहे. यामध्ये वरळी नाका, माटूंगा स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क), राम नगर-मालाड (प), भायखळा, चेंबूर, अणुशक्ती नगर, सायन कोळीवाडा, दहिसर, आनंद नगर, शहाजीराजे क्रीडांगण-मालाड, लोखंडवाला-कांदिवली, खार (प) या ठिकाणांचा त्यात समावेश आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.

वीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली आरती

जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्यां ताराया
आर्यांच्या देशावरि म्लेच्छांचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला !
सद्गदिता भूमाता दे तुज हांकेला
करुणारव भेदुनी तव हृदय न कां गेला
जयदेव जयदेव जय जय शिवराया
श्री जगदंबाजीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनि जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळतां
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?
जयदेव जयदेव जय जय शिवराया
त्रस्त अम्ही दीन अम्ही शरण तुला आलों
परवशतेच्या पाशीं मरणोन्मुख झालों
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन्‌ भगवद्‌गीता सार्थ कराया या
जयदेव जयदेव जय जय शिवराया
ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला
देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला
जय देव जय देव जय जय शिवराया ||
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.