भाजप-शिवसेना सरकार सदैव बळीराजाच्या पाठिशी – प्रवीण दरेकर

118

मयूर उद्योग समूह, कोल्हापूर आणि डॉक्टर अंकल यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य ‘मयूर कृषी महोत्सव २०२३’ चा शुक्रवारी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. हा कृषी  महोत्सव शेतकऱ्यांना एक नवीन उमेद, प्रेरणा देणारा आहे. अशा प्रकारच्या उपक्रमासाठी, बळीराजासाठी मदत लागली तर मी आणि सरकार सदैव पाठीशी आहे, असे आश्वासन यावेळी दरेकर यांनी उपस्थितांना दिले.

शेती अवजारांवर १०० टक्के अनुदान देत आहे

दरेकर म्हणाले की, खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या कृषी महोत्सवाची आज गरज आहे. दिवसेंदिवस शेतीचे उत्पादन वाढविण्याची, शेतकऱ्याला सशक्त बनविण्यासाठी वेगवेगळे तंत्रज्ञान आणून शेतीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन कसे होईल, आर्थिकदृष्ट्या शेतकरी संपन्न कसा होईल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अलीकडच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर उभे राहताना दिसून आले. या देशात अनेक सरकारे झाली, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाची धुरा खांद्यावर घेतली तिथपासून त्यांच्या कामकाजात, संपूर्ण विकासकामांत शेतकऱ्यांची काळजी घेणे, शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचे काम त्यांनी विविध योजनांच्या माध्यमातून या देशात केले आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये दिले जातात, जे प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हफ्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. तसेच पीएम किसान मानधन योजनेद्वारे वयाच्या ६० वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळते. तर प्रधानमंत्री कुसुम या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी ६० टक्के अनुदान आणि ३० टक्के कर्ज देत आहे. या योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतात सौर पंप किंवा कूपनलिका बसवू शकतात. केंद्र सरकार शेती अवजारांवर १०० टक्के अनुदान देत असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.

(हेही वाचा शिवसेना कुणाची?; निवडणूक आयोग घेणार आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची ओळख परेड)

शिंदे-फडणवीस यांचे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे

पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा हा शेतीच्या बाबतीत प्रगत आहे. महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत कोल्हापूरचा शेतकरी सधन आहे. शहराच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. परंतु शिरोळसारखा शेतीसाठी चांगला तालुका अजूनही पाण्याने त्रस्त आहे. अलमट्टीचे पाणी आपल्याकडे शिरत नाही असे एखादे वर्ष जात असेल. शेती केली तर उध्वस्त होते. जेजे उभे केले ते महापूर आला तर टिकेल याची शाश्वती नसते. त्यामुळे सतत आपला जीव मुठीत घेऊन शिरोळवासीयांना राहावे लागत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या विषयाचे गांभीर्य केंद्राच्या नजरेत आणून देऊ. कायमस्वरूपी उपाय करण्याचा प्रयत्न भाजपाच्या माध्यमातून केला जाईल, असे आश्वासनही यावेळी दरेकर यांनी दिले. दरेकर पुढे म्हणाले की, महापुराच्यावेळी संवेदनशीलतेने कुणी काम केले असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ते मुख्यमंत्री असताना. शिंदे-फडणवीस यांचे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आहे. सहा महिन्याच्या काळात राज्यातील जनतेच्या मनात हे आपले सरकार आहे, असा विश्वास निर्माण झाला आहे. मागील सरकारने नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते, पण दिले नाही. ते शिंदे-फडणवीस सरकारने दिले. तसेच सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी १५ हजार रुपये याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल असे नागपूर अधिवेशनात जाहीर केले. धान उत्पादक जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करत आहे, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.

शेतीशी माझी नाळ जोडलेली

मी मुंबई शहरात राहत असलो, तरी माझी शेतीशी नाळ जोडलेली आहे. मी कोकणातील खेड्यातून मुंबईत गेलो. त्यामुळे मला शेतीविषयी नीट माहिती आहे. त्यातच मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष असल्याने बँक जरी मुंबईची असली तरी महाराष्ट्रातील ग्रामीण भागांत असणारे साखर कारखाने, सूत गिरण्या, वेगवेगळ्या प्रकारचे शेतीवर प्रक्रिया करणारे उद्योग, त्यांना अर्थपूरवठा करण्याचे काम गेली २० वर्ष मी सातत्याने करत असल्याने मला या विषयातील चांगली माहिती आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या महोत्सवाला पाठबळ द्यायला आलो असल्याचेही दरेकर यांनी सांगितले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.