भाजपने ८२ नगरसेवक टीकवून दाखवावेत! भाई जगताप यांचे आव्हान

खोट्या पध्दतीने प्रभागांची पुनर्रचना करून भाजपने स्वत:चा फायदा करून घेतला, पण जनतेचे नुकसानच झाले आहे. त्यांना निवडून दिल्यामुळे जनतेलाच आता पश्चाताप होत आहे, असे भाई जगताप म्हणाले.

156

मुंबई महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी शास्त्रोक्त पध्दतीने प्रभागांची पुनर्रचना न करता चुकीच्या पध्दतीने केल्यामुळे तसेच केंद्रात आणि राज्यात त्यांचे सरकार, ईव्हीएमचा वापर तसेच प्रचंड पैशांचा वापर करत भाजपने आपले जास्त नगरसेवक निवडून आणले होते. हे त्यांचे यश खरे नसून खोटे आहे. भाजपच्या नगरसेवकांना निवडून दिल्याचा पश्चाताप आता जनतेला होत असून ज्या भाजपने मुंबईत ८२ नगरसेवक निवडून आणले आहे, ते त्यांनी आता पुढील निवडणुकीत टीकवून दाखवावे, असे आव्हान भाजपचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी दिले आहे.

४५ प्रभागांमध्ये सिमांकनाचा घोळ!

मुंबई काँग्रेसच्यावतीने मुंबईतील विविध मुद्दयांबाबत महापालिका वार्ताहर संघात पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस चरणजितसिंग सप्रा, विरोधी पक्षनेते रवी राजा, सरचिटणीस भुषण पाटील आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत भाई जगताप यांनी मुंबईतील ४५ प्रभागांबाबत लक्ष वेधून घेतले. नियमानुसार २२७ प्रभागांची पुनर्रचना करता येणार नाही. कारण ती दर दहा  वर्षांनी होते. परंतु या २२७ प्रभागांपैकी ४५ प्रभाग हे असे आहेत की ज्यामध्ये सिमांकनाचा प्रचंड घोळ आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना  या प्रक्रियेला बगल देवून भाजप सरकारच्या दबावाखाली महापालिका प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली. हा आमचा आरोप नव्हे तर लिखित तक्रारही आहे. त्यामुळे याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्यावतीने प्रा. जनार्दन चांदुरकर यांच्यासह विरेाधी पक्षनते रवी राजा, अमिन पटेल, चंद्रकांत हंडोरे यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या अहवालातही सिमांकन हे सदोष आणि चुकीच्या पध्दतीने केले असल्याची बाब अधोरेखित केली असल्याचे सांगत याबाबत विरेाधी पक्षनेते रवी राजा यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना या ४५ प्रभागांची पुनर्रचना करण्याची मागणी केली होती. त्यावर त्यांचे सकारात्मक पत्र आले आहे याचे आम्ही स्वागत करतो, असे भाई जगताप म्हणाले.

(हेही वाचा : महापालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला कापरे भरले! अतुल भातखळकरांची टीका)

मागील निवडणुकीतील भाजपचे यश खोटे!

४५ प्रभागांची पुनर्रचना ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वाढतील किंवा भाजपचे कमी होतील, याकरता नसून हे सिमांकन चुकीच्या पध्दतीने झाले आहे, त्यांची सुधारणा करण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. मागील निवडणुकीतील भाजपचे यश हे पूर्णत: खोटे आहे. केंद्रातील सरकार, राज्यातील सरकार, ईव्हीएम मशीनचा आणि अमाप पैशांचा वापर याद्वारे मिळवलेले ते यश आहे. त्यांचे जे ८२ नगरसेवक निवडून आले आहे. खोट्या पध्दतीने प्रभागांची पुनर्रचना करून त्यांनी स्वत:चा फायदा करून  घेतला, पण जनतेचे नुकसानच झाले आहे. त्यांना निवडून दिल्यामुळे जनतेलाच आता पश्चाताप होत आहे. दहिसर बोरीवली, कांदिवली, कुलाबाा, मुलुंड,घाटकोपर आदी ठिकाणचे मतदार संघ आपल्यासाठी अनुकूल बनवूनच त्यांनी आपले नगरसेवक निवडून आणले आहे. पण या प्रभागांची पुनर्रचना झाल्यानंतर खरे चित्र समोर येईल, असेही ते म्हणाले.  त्यामुळे चुकीच्या पध्दतीने ८२ नगरसेवक निवडून आणणाऱ्या भाजपने आता आगामी निवडणुकीत किमान या सर्व जागा टीकवून दाखवाव्यात, असेही आव्हान जगताप यांनी दिले आहे. त्यांचे एवढे नगरसेवक निवडून आले, पण त्यांनी मुंबईसाठी भरीव काय केले, हे तरी त्यांनी सांगावे, असाही सवाल त्यांनी केला.

भाजपनेच आरक्षणाला मूठमाती दिली!

ओबीसीच्या मुद्दयावरूनही भाई जगताप यांनी भाजपचा समाचार घेतला. ओबीसी आरक्षणाच्या फाईलवर स्वाक्षरी करताना फडणवीस यांचे हात का थांबले नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण मिळवण्यासाठी न्यायालयात जेवढी ताकद लावता येईल तेवढी लावली जाईल, असेही ते म्हणाले. भाजपनेच आरक्षणाच्या मुद्याला मूठमाती देण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.