भाजपने आक्रमकता आमच्याकडून शिकावी : शिवसेनेने शेलारांना खिजवले

147

नायर रुग्णालयातील घटनेवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता सभागृहाबाहेरही शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांची झोंबाझोंबी सुरु झाली आहे. भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी स्थायी समिती अध्यक्षांवर केलेल्या आरोपांनंतर यशवंत जाधव यांनीही याचा समाचार घेत शेलारांना शालजोडीतले मारले. ते म्हणाले, आशिष शेलारांनी आम्हाला सभागृहातील शिस्त, कायदे आणि नियम शिकवू नयेत. सभागृहाच्या अध्यक्षांच्या दालनात घुसून गैरवर्तन केल्यामुळे आणि असंवैधानिक भाषा वापरल्यामुळे ते स्वतः आणि भाजपचे १२ आमदार विधानसभेतून निलंबित झाले आहेत. त्यांनी आमच्याबद्दल गुंडगिरीची भाषा वापरावी आणि आम्हाला संस्कारांचे धडे द्यावेत, यासारखा दुसरा विनोद नाही.  आक्रमकपणा आणि गुंडागर्दी यात फरक आहे. आम्ही आक्रमक आहोत आणि शेलारांनी विधिमंडळात केली त्याला गुंडागर्दी म्हणतात. भाजपने आमच्याकडून आक्रमकपणा शिकून घ्यावा, अशा शब्दात त्यांचा समाचार घेत त्यांना खिजवले.

कितीही करा निवडणुकीत विजय होणार नाही!

शेलार यांची आजची पत्रकार परिषद शिवसेनेच्या द्वेषाने ठासून भरली होती. कितीही प्रयत्न केले, तरी पालिका निवडणुकीत विजय होणार नाही, हे लक्षात आल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्या नैराश्यातून आशिष शेलार आणि भाजपचे नेते भलते सलते आरोप करीत आहेत. एकामागून एक खोटे आरोप करायचे, रोज सगळ्या नेत्यांकडून चार चार पत्रकार परिषदा घ्यायच्या, हाच भाजपच्या नेत्यांचा एकमेव उद्योग आहे, असे ते म्हणाले.

महिलांना पुढे करून…

या आरोपांना प्रत्युत्तर देताना, कुणीही गुंड बोलावलेले नाहीत, असे सांगत ज्यांचा संदर्भ आशिष शेलार यांनी दिला आहे, ते आमचे शिवसैनिक असून ते प्रत्येक नगरसेवकाबरोबर असतातच असे त्यांनी सांगितले. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, आम्ही सभागृहाबाहेर पडत असताना भाजपने आपल्या महिला नगरसेविकांना पुढे करून आमच्यावर शिवराळ भाषेत टिप्पणी केली. भाजपच्या काही नगरसेविका शिवसेना नगरसेवकांच्या अंगावर धावून जात होत्या. भाजपच्या अकार्यक्षम पुरुष नगरसेवकांनी महिलांना पुढे करून हे घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला असल्याचाही आरोप जाधव यांनी केला.

(हेही वाचा भाजप नगरसेविकांच्या अंगावर आले गुंड! भाजपा नेते आशिष शेलार यांचा आरोप)

नगरसेवकांच्या क्षमतेवर, विश्वासावर प्रश्नचिन्ह

सभागृहात आजच्या घडीला भाजपचे ८२ नगरसेवक आहेत. भाजपचे नगरसेवक प्रत्येक समितीत सदस्य आहेत. तिथे आलेल्या प्रत्येक प्रस्तावाला त्यांचे समर्थन असते. पालिकेत जे काही घडते त्याची माहिती त्यांना असतेच.  मात्र आज एकही नगरसेवक शेलार यांच्या पत्रकार परिषदेत बोलला नाही. फक्त शेलार स्वतःच बोलले. याचा सरळ अर्थ असा आहे की त्यांच्या नगरसेवकांची क्षमता नाही, किंवा शेलार यांचा त्यांच्यावर विश्वास नाही. यापैकी खरे काय ते भाजपनेच ठरवावे, असाही टोला मारला.

जाधवांना शेलारांकडून हवेय या प्रश्नांचे उत्तर

घडलेली घटना दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशी घटना कधीही घडू नये अशीच आमची भावना आहे. आणि या घटनेचे जे राजकारण भाजप आणि त्या पक्षाचे नेते करीत आहेत ते सुद्धा माणुसकीला काळिमा फासणारे आहे. निवडणुका पाहून भाजपने इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये. भाजपा उठसुट स्थायी समिती अध्यक्षांवर कोर्टात केस करते, मग कंत्राट चुकीचे असेल, तर प्रशासनविरोधात कोर्टात का जात नाही याचे उत्तर शेलार देतील का, असा सवालही जाधव यांनी केला आहे

गळा दाबीन का म्हणालो…

“गळा दाबीन” असे मी म्हटलेच नाही. नायर रुग्णालयात घडलेली घटना गंभीर आहे. आणि तेथील कर्मचाऱ्यांनी केलेला निष्काळजीपणा अक्षम्य आणि चीड आणणारा आहे. तिथे कुणीही सामान्य माणूस असता तरी त्याने संबंधित कर्मचाऱ्यांचा गळा दाबला असता, असे मी म्हणालो. त्यात कर्मचाऱ्यांचे वर्तन इतके चीड आणणारे होते, ते इवलेसे बाळ वेदनांनी तडफडत होते, आणि असंवेदनशील कर्मचारी बघ्याची भूमिका घेऊन होते, ही पराकोटीची असंवेदनशीलता आहे, अशी चीड आणणारी ही घटना आहे, असे माझे म्हणणे होते. भाजप या मुद्द्याचा नको तितका बाऊ करीत आहे. आता आम्ही आमच्या संतप्त भावना कोणत्या शब्दांत व्यक्त करायच्या? आज शेलारांनी “निजवले” असा शब्दप्रयोग केला आहे. तो कोणत्या शिष्टाचारात बसतो, असाही सवाल त्यांनी केला.

(हेही वाचा माहुरच्या पंपिंग स्टेशनसाठी खासगी विकासकाची जागा : प्रस्ताव मंजुरीत सत्ताधाऱ्यांची घाई)

आशिष शेलार यांनी केलेले आरोप

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भायखळ्यातील गुंड सभागृहाबाहेर बोलावले. त्यांनी भाजपा नगरसेविकांना धक्काबुक्की केली. मुंबईकरांनी निवडून दिलेल्या नगरसेविकांसोबत असे वागणार? गुंडाकडून अशी धक्काबुक्की करणार? हे गब्बर सिंगचे राज्य आहे काय? असा सवाल करीत आमदार ऍड आशिष शेलार यांनी या सगळ्या घटनेचे चित्रण आमच्याकडे आहे, त्यामुळे त्याची चौकशी करा, अशी मागणी केली होती. कितीही दादागिरी केलीत, कितीही झोंबले. तरी आम्ही हे प्रश्न विचारणारच, असा इशारा देत आमदार ऍड.आशिष शेलार यांनी शिवसेना आणि यशवंत जाधव यांच्यावर आरोप केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.