‘शिवचरित्राचा महान उपासक गमावला’

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र सोप्या व रंजक भाषेत जनसामान्यांना समजावून देणारा आणि शिवचरित्राच्या अभ्यासासाठी आयुष्य समर्पित केलेला महान उपासक गमावला आहे, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सोमवारी वयाच्या शंभरी पार केल्यानंतर कार्तिकी एकादशीच्या दिवशी प्राणज्योत मालवली. त्यावेळी बाबसाहेबांना आदरांजली वाहताना, चंद्रकांत पाटील यांनी शिवचरित्राच्या अभ्यासासाठी आयुष्य समर्पित केलेला महान उपासक गमावला असं म्हटलं आहे.

जाणता राजा या महानाट्याची निर्मिती

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतला. त्यांनी असंख्य ग्रंथ अभ्यासले, गड किल्ल्यांना भेटी दिल्या आणि सरदार घराण्यांकडून माहिती घेतली. अभ्यासाच्या आधारे, त्यांनी शिवचरित्र अत्यंत सोप्या आणि रंजक पद्धतीने लोकांसमोर मांडले. महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची जाणीव करून देण्याचे आणि त्यांच्यात शिवप्रेरणा जागविण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी लाखो घरांपर्यंत शिवचरित्र पोहचविले. जाणता राजा या महानाट्याची निर्मिती करून त्यांनी शिवचरित्र नाट्यमय पद्धतीने समजावून दिले. आयुष्यभर शिवचरित्राची उपासना करणाऱ्या या महान उपासकाला भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविले. आपण त्यांना भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रतर्फे विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. असं चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले.

(हेही वाचा  स्वातंत्र्यवीरांच्या शब्दांनी बदललं बाबासाहेबांचं आयुष्य )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here