मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी २६ फेब्रुवारीपासून उपोषण करणार असल्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केले, त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. मराठा समाजासाठी मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भारतीय जनता पार्टी पूर्ण समर्थन देईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पुणे येथे सांगितले.
आजच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे : २६ फेब्रुवारी पासून मी स्वतः आमरण उपोषणास बसणार…
समाजाच्या प्रमुख मागण्या, त्यांची सद्यस्थिती व आमच्या अपेक्षा…
https://t.co/WnJjgSGcsH— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 14, 2022
महाविकास आघाडीनं आरक्षण घालवले
‘जे ओबीसींना ते मराठा समाजाला’ असे सूत्र वापरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगाराच्या अनेक सवलती दिल्या तसेच आरक्षणही दिले. परंतु महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण गमावले. तसेच मराठा समाजासाठी भाजप सरकारने सुरू केलेल्या योजनांची अंमलबजावणीही होत नाही.
मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल
फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरू केली, मराठा समाजातील विद्यार्थ्यांची निम्मी फी भरली व त्यासाठी ७८५ कोटी रुपये खर्च केले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याज दहा लाख रुपये कर्जाची योजना सुरू केली, मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतीगृहे सुरू केली. आज हे सर्व बंद आहे. त्यामुळे आता श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे किंवा राजे समरजितसिंह घाटगे अशा छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
( हेही वाचा : काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडायला ‘हे’ ठरु शकते कारण? )
भाजपा घाबरणार नाही
मराठा समाजासाठी भारतीय जनता पार्टीने आंदोलन सुरू केले तर त्याला राजकीय वळण येईल. त्यामुळे भाजपा असे आंदोलन करणाऱ्या मान्यवरांना पूर्ण समर्थन देईल, असेही त्यांनी सांगितले. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा सत्कार करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी पुण्यात गुन्हे दाखल केले आहेत, त्याविषयी विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला नाही. पण ज्या पायरीवर सोमय्या यांना ढकलण्यात आले त्या पायरीवर त्यांचा सत्कार करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा सत्तेचा दुरुपयोग आहे. भाजपा यामुळे घाबरणार नाही.
Join Our WhatsApp Community