महापालिकेविरोधात सदोष ‘वृक्षवधाची’ याचिका दाखल करणार भाजप!

पालिकेच्या बेजबाबदार वर्तनाचा तीव्र निषेध भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी स्थायी समितीत केला.

165

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई शहरात २ हजार ३६४ वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या आहेत. वादळानंतर ४८ तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटवण्यात आलेल्या नाहीत. याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता, हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समिती समोर १८ मार्च २०२१ पासून आजतागायत प्रलंबित असून, याला जबाबदार कोण? असा सवाल करत येत्या आठवडाभरात वृक्ष प्राधिकरणामध्ये वृक्ष छाटणीच्या प्रस्तावास मंजुरी देऊन प्रत्यक्ष वृक्ष छाटणीस प्रारंभ करा. नाहीतर मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप उच्च न्यायालयाचे दार ठोठावेल, असा गंभीर इशारा भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत दिला.

यंत्रणा तोकडी

तौक्ते चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचा केवळ देखावा करण्यात आला. तौक्ते नैसर्गिक आपत्तीत महापालिका प्रशासनाच्या मनुष्यबळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. वादळानंतर ४८ तासांचा कालावधी उलटूनही रस्त्यावर पडलेल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या बाजूला करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहतुकीला अडचण होत आहे. नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाताना उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मोठी झाडे कापण्यासाठी साधनसामुग्री, विद्युत करवती उपलब्धच नाहीत. रस्त्यावरील पालापाचोळा उचलण्यासाठी यंत्रणाच तोकडी पडल्याचे चित्र आहे.

(हेही वाचाः तौक्ते चक्रीवादळाने राज्यात पाडले साडेपाच हजार विजेचे खांब)

भाजपने नोंदवला निषेध

वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता, तर मार्च-एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने कितीतरी झाडे कोसळलीच नसती. वृक्ष प्राधिकरण समितीच्या या अक्षम्य विलंबामुळे मुंबई शहर हजारो मोठ्या आणि प्राचीन वृक्षांना मुकले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी, गाड्यांची नासधूस झाली आहे. पालिकेच्या या बेजबाबदार वर्तनाचा तीव्र निषेध भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी स्थायी समितीत केला.

ही आहे उद्यान विभागाची माहिती

मुंबईत वृक्षांच्या धोकादायक फांद्या आणि मृत झाडे कापण्यासाठी कंत्राटदारांचा कालावधी ३ जून २०२१ पर्यंत आहे. पण त्यातील काही कंत्राटदारांची खर्च करण्याची क्षमता संपुष्टात आली आहे, तर काहींची शिल्लक आहे. तसेच नवीन कंत्राट मंजुरीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणा पुढे प्रलंबित आहे. परंतु खर्चाची क्षमता संपलेले कंत्राटदार काम करत आहेत. त्यामुळे प्राधिकरण मंजुरीनंतर नवीन कंत्राटदारांची नियुक्ती केली जाईल. पण तोपर्यंत आताच्या कंत्राटदारांकडून काम करुन घेतले जात असून, त्यात कुठेही खंड पडला नसल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे.

(हेही वाचाः आता पेंग्विन कंत्राटदार उभारणार मुंबईतील ऑक्सिजन प्लांट!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.